नागपूर Audi Car Hit Three Vehicles : नागपूर शहरात 'हिट अँड रन'ची घटना घडलेली आहे. रात्री उशिरा एका भरधाव ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अपघातास कारणीभूत त्या ऑडीकारचा वेग मर्यादेपेक्षा अतिशय जास्त होता. त्यामुळं अपघातात दोन्ही कारचं आणि दुचाकीचं नुकसान झालं आहे. याशिवाय कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल : नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना काचीपुरा चौक ते रामदासपेठकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी कार चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांच्या विरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले : मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. तर अपघातास कारणीभूत ठरलेली ऑडी कार ही भाजपा नेत्याच्या कुटुंबाशी संबंधित असल्यानं सध्या तरी पोलीस यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत.
भाजपा नेत्यानेच दिली माहिती : यासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा नेत्यानंच पुढे येऊन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. हे भाजपा नेते आहेत राज्याचे भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी सांगितलं, "माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो." आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीच अशी प्रतिक्रिया दिल्यानं पोलीस नेमकी कशा पद्धतीनं कारवाई करतात याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -