अमरावती Village of Mango : मेळघाट म्हटलं तर सातपुड्याच्या उंच पर्वत रांगा, अनेक दऱ्या, घनदाट जंगल, नदी धबधबे, वाघ ,अस्वल, रानगवे अशी जंगली श्वापदं आणि कोरकू गोंड अशा आदिवासी जमातींची अनेक छोटी गावं असंच चित्र डोळ्यासमोर उभं राहातं. मात्र याच मेळघाटात चक्क एक आंब्याचं गाव देखील आहे. एक नव्हे तर एकूण चार गावात जिकडे तिकडे आंब्याची भली मोठी झाडं वाढलेली दिसतात. गावातील प्रत्येकाकडे आमराई आहे. आंब्याच्या उत्पादनामुळं ही गावं समृद्ध होत आहेत. मेळघाटातील हे आंब्याचं गाव चिखलदरापासून अवघ्या काही अंतरावर वसलं आहे. 'व्हिलेज ऑफ मँगो' अर्थात आंब्याचं गाव अशी ओळख असणाऱ्या आमझरी या गट ग्रामपंचायतमध्ये आमझरीसह खटकाली, मेमना आणि टॅटू या चार गावातील आंब्याच्या वैशिष्ट्या संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं घेतलेला हा विशेष आढावा.
जिकडे तिकडे आंबा : मेळघाटात सागवानचे वृक्ष हे सर्वत्र आढळतात. आमझरी परिसरात डोंगरावर आणि सपाट प्रदेशात देखील जिकडं तिकडं मोठ्या प्रमाणात आंब्याची शेकडो झाडे बहरलेली आहेत. आमझरी गट ग्रामपंचायत अंतर्गत आमझरी खटकाली, मेमना आणि टॅटू अशी चारही गावं एकमेकांना लागूनच आहेत. या चार गावांची लोकसंख्या अंदाजे दोन हजारापर्यंत आहे. आता आंब्याच्या या सीझनमध्ये या परिसरात रस्त्यावर कैरी आणि अनेक ठिकाणी पिकलेल्या आंब्याचा सडा पडलेला दिसतो. या भागातील आंबा झाडावरुन खाली मोठ्या प्रमाणात झरतो, यामुळंच हा संपूर्ण परिसर आमझरी म्हणून ओळखला जातो असं स्थानिक रहिवासी सांगतात.
आंब्याच्या शेतीतून समृद्धी : आमझरी परिसरात आंब्याची अनेक झाडं शेकडो वर्षांपासून असली तरी आंब्याचा उपयोग व्यापारासाठी या भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी यापूर्वी फारसा केला नाही. गेल्या दहा-पंधरा वर्षात मात्र वनविभागाच्या मदतीमुळं या भागातील आदिवासी बांधव आपल्या हक्काच्या जमिनीवर आंब्याची झाडं लावत आहेत. वन जमिनीवरील आंब्याचं संरक्षण करणं जतन करणं या अटींवर वनविभाग देखील शेतकऱ्यांना जंगलातील झाडांवर अधिकार देत आहेत. आंब्याच्या उत्पादनातून आमझरी गावात आता समृद्धी नांदायला लागलीय.
आठ ते दहा लाखापर्यंत उत्पन्न : आमझरी या छोट्याशा गावात बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या शेतात आंब्याची झाडं लावली आहेत. केसर, लंगडा, हापूस अशा आंब्याच्या विविध प्रजाती शेतात लावण्यात आल्या आहेत. मेळघाटात आंब्यासह विविध फळांच्या अनेक प्रजातीचा प्रसार प्रचार करणारे रमेश जोशी यांच्या माध्यमातून आमझरी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध प्रजातीच्या आंब्याची लागवड केलीय. यावर्षी आमचा आंबा अद्याप विकला नाही. मात्र आता काही दिवसांत शेतातील 500 आंब्याच्या झाडांचे आंबे विकल्यावर दोन लाख रुपये मिळतील असं आंबा उत्पादक शेतकरी गोपी दिक्कर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
मन की बात मध्ये उल्लेख : आमझरी गावालगत खटकाली परिसरात आंब्याच्या बागा असणारे प्रकाश जांभेकर यांच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात घेतली होती. केशर, दशहरी, लंगडा, हापूस अशा आंब्याच्या विविध प्रजातींची 220 झाड माझ्याकडे असल्याचं प्रकाश जांभेकर यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
गावरान गोटी आंब्याला सर्वाधिक मागणी : आमझरी परिसरात विविध प्रजातीचे आंबे उपलब्ध असले तरी या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात गावरान गोटी आंबा आहे. या परिसरातील आंबा तोडण्यासाठी अचलपूर वरुन अनेक युवक येतात. या जंगलातला आंबा झाडावरुन विशिष्ट पद्धतीनं तोडल्यावर तो अमरावती, अकोला असा दूरपर्यंत विकला जातो अशी माहिती अचलपूर येथील रहिवासी मुजफ्फर शहा यांनी दिली. एका आंब्याच्या झाडावरुन दिवसभरात जवळपास आठ ते दहा पोती आंबे काढले जात असल्याची माहिती देखील मुजफ्फर शाह यांनी दिली.
रस्त्यावरुन जंगलात आंब्याचा सडा : आमझरी परिसरात रस्त्यावर सध्या जिकडे तिकडे आंब्याचा सडा पडलेला दिसतो. मुख्य रस्त्यासोबतच जंगल परिसरात झाडाच्या खाली जिकडे तिकडे आंबे पडलेले दिसतात. अतिशय गोड असणारे हे आंबे गावातील चिमुकले झाडाखालीच खाताना दिसतात. विशेष म्हणजे या भागात येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यावर अगदी सहज आंबे उपलब्ध होत असल्यामुळं अनेकजण तर पिशवी भरुन तर कोणी पोतं भरुन आंबे आपल्या गाडीत नेताना या भागात दिसतात. येणाऱ्या काळात या आंब्यामुळं आमझरी गाव आणि गावातील प्रत्येक जण निश्चितच समृद्ध झाल्याचं चित्र पाहायला मिळेल असं आमझरी परिसरात विविध प्रजातीच्या आंब्याची रोपं पुरवणारे रमेश जोशी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा :