सांगली Maharashtra Road Accident : भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली. हा भीषण अपघात सांगलीच्या तासगाव मधल्या चिंचणी या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री घडला आहे. मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्वजण कवठेमहांकाळ तालुक्यातल्या कोकळे येथून नातीचा वाढदिवस साजरा करून तासगावला परतत होते. यावेळी चिंचणी नजीक असणाऱ्या ताकारी कॅनॉलमध्ये पाटील कुटुंबीयांची गाडी जाऊन कोसळली. यामध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 60), पत्नी सुजाता राजेंद्र पाटील ( वय 55), प्रियांका अवधूत खराडे ( वय 30 ), नात ध्रुवा ( वय तीन ), राजवी ( वय दोन ), कार्तिकी ( वय एक ), यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नाली विकास भोसले या जखमी झाल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास चिंचणी गावातील काही लोक मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, हा भीषण अपघाताचा प्रकार समोर आला.
वाढदिवस साजरा करुन परत येत होते कुटुंब : तासगाव इथं राहणारे अभियंता राजेंद्र पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे या गावात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यावेळी वाढदिवस साजरा करुन हे कुटुंब परत येत होते. यावेळी तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री राजेंद्र पाटील यांची अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्याचं आज सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
वाढदिवस असलेल्या नातीचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू : राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली किरण भोसले हीचं सासर कवठेमहांकाळ तालुक्यातल्या कोकळे इथं आहे. स्वप्नाली भोसले यांची 2 वर्षीय मुलगी राजवी हिचा वाढदिवस मंगळवारी होता. त्यासाठी पाटील कुटुंबीय हे कोकळे या ठिकाणी गेले होते. नातीचा वाढदिवस साजरा करुन नात आणि मुलीला घेऊन राजेंद्र पाटील आपल्या कुटुंबासह रात्री उशिरा तासगावकडं परतत होते. यावेळी गाडीवरील ताबा सुटल्यानं कार कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. यामध्ये पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंब आणि नात राजवी भोसले देखील ठार झाली. मात्र या अपघातात राजवी हिची आई स्वप्नाली भोसले या बचवल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :