पुणे Tiger Skin Selling Case : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या बॉर्डरवरील जंगलामध्ये नीलगाईच्या मृतदेहात रासायनिक द्रव्य टाकून वाघिणीला हे कातडं खायला दिलं आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर त्या वाघिणीला मारून जवळपास पाच कोटी रुपयांची वाघाची कातडी विकणाऱ्या सहा जणांना पुणे सीमाशुल्क विभागाच्यावतीनं अटक करण्यात आली आहे.
वाघिनीला ठार करण्यासाठी अवलंबिला 'हा' मार्ग : अटकेतील आरोपींमध्ये दोन महिलांचा सहभाग आहे, अशी माहिती सीमा शुल्क आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली. 26 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सीमा शुल्क पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खबऱ्याकडून जळगाव परिसरात हे आरोपी पहाटे कातडं विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी या सहा आरोपींना अटक करण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या बॉर्डरवरील जंगलामध्ये नीलगाईच्या मृतदेहात रासायनिक द्रव्य टाकण्यात आलं होतं. त्यावेळी त्या परिसरातील वाघिणीनं हे कातडं खाल्लं आणि ती बेशुद्ध झाली. यानंतर त्या वाघिणीला या आरोपींनी मारलं आणि तिची पूर्ण कातडी काढून घेतली. तसेच मृतदेहातील इतर भाग जमिनीमध्ये पुरला गेला असल्याचं यावेळी वनगे यांनी सांगितलं.
कातड्याची किंमत पाच कोटींच्या घरात : सहा आरोपींपैकी दोन महिला असून त्यांनी हे कातडं इतर लोकांच्या नजरेस पडू नये याकरिता स्वतःच्या शरीराला साडीच्या भागांमध्ये बांधून ठेवलं होतं. या वाघिणीचं वय पाच वर्ष असून आठ फूट लांब इतकं हे कातडं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कातड्याची किंमत ही पाच कोटी रुपये इतकी आहे. त्याच सोबत यातील एका आरोपीनं यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये बेकायदेशीररीत्या 'टायगर ट्रॉफी' विकत घेतली होती. याचीही माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्याच्याकडून एक वाघाचं कातडं आणि बिबट्याचं कातडंही जप्त करण्यात आलं. सध्या या आरोपींना जळगाव जेल येथे ठेवण्यात आलं असून वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, असं सीमाशुल्क आयुक्त यशोधन वनगे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :