मुंबई - बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत आणि तोच मुंबईतील सायन-कोळीवाडा भागात एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलाय. एका गर्दुल्याने या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. सायन-कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनी येथे असलेल्या झोपडपट्टीच्या इथे एका इमारतीचे काम सुरू आहे, तिथेच ही घटना घडली असून, उपस्थित नागरिकांनी सदर नराधमाला पोलिसांच्या हवाली केलंय.
चिमुरडीवर निर्जनस्थळी अत्याचार : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल गुप्ता अंमली पदार्थांच्या नशेमध्ये रात्री या परिसरात फिरत होता. त्याने या चिमुरडीला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. चिमुरडीचा ओरडण्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता सदर प्रकार समोर आला. उपस्थित संतप्त जमावाने या नराधमाल चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलंय. सदर पीडित चिमुकलीचे वय तीन वर्षे असून, सध्या या चिमुरडीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या पीडित मुलीची तब्येत गंभीर असल्याची माहिती समोर आलीय.
चिमुकली सायन रुग्णालयात दाखल : या प्रकरणानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित पोलीस प्रशासन आणि शासनाला इशारा दिलाय. अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सायन-कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरलीय. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केलाय. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाशी झुंज देत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे."
'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे!
— Amit Thackeray (@amitrthackeray) November 26, 2024
सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. pic.twitter.com/ERKKeOPETB
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर : अमित ठाकरे पुढे लिहितात की, "मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतंय, अनेक घरं उद्ध्वस्त होताहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात असलेल्या गर्दुल्ल्यांची संख्या वाढली असून, महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्यात. कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात 5 टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कारवाई करण्यात आलीय. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतो कुठून? ते पोहोचतो कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालंय."
ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कारवाई होणार : "मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतलीय. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे. सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे," असंदेखील अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय.
नराधमांना त्यांची जागा दाखवणार : याप्रकरणी अमित ठाकरे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून, त्यांनी म्हटले आहे की, "जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की, आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची," असंही अमित ठाकरे म्हणालेत.
हेही वाचा :