मुंबई : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असल्याने देशभरात विविध कार्यक्रम सुरू आहेत. देशभरात विविध मंदिरांमध्ये आरती भजन यासह स्वच्छतेचे कार्यक्रम आणि रांगोळीचे कार्यक्रम सुरू आहेत. अयोध्या नगरीतही स्वच्छतेसह रांगोळीचे कार्यक्रम सुरू असून महाराष्ट्रातील एक तरुण या कामांमध्ये गुंतला आहे. स्टीलच्या मोठ्या किटलीमध्ये एका वेळेस पाच ते सहा किलो रांगोळी घेऊन हा तरुण पाच मिनिटात 100 मीटर रस्त्यावर रांगोळी काढतो.
कोण आहे सुनील कुंभार - सुनील कुंभार हा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याने रांगोळी जलद काढण्याचे हे तंत्र स्वतः विकसित केले आहे. मोठ्या किटलीमध्ये रांगोळी भरून तो न थकता ही रांगोळी काढतो. दोन तासांमध्ये एक किलोमीटर रस्ता तो अशा पद्धतीने रांगोळी काढून सजवतो. तो स्वतः स्वखर्चाने अयोध्येत आला असून त्याने सोबत दोन हजार किलो रांगोळी साहित्य आणले आहे. येताना त्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही छोट्या शहरांमध्ये थांबून रांगोळी काढून लोकांचे प्रबोधन केले असल्याचे सुनील सांगतो.
राम मंदिराचा पास नाही : सुनील तीन दिवसांपूर्वी अयोध्येत पोहोचला आहे. त्याने अयोध्येतील रस्त्यांवर रांगोळी काढायला सुरुवात केली आहे. 22 तारखेपर्यंत अयोध्येतील बहुतांश मंदिर परिसरातील रस्ते तो रांगोळीने सजवणार आहे. मात्र त्याला मंदिर परिसरात रांगोळी काढण्यास परवानगी मिळालेली नाही. मंदिरातला पास मिळाला असता तर मंदिर परिसर खूप चांगल्या पद्धतीने मी सजवू शकलो असतो. ती माझी इच्छा होती, पण तरीही अयोध्या नगरीत रांगोळी काढायला मिळाली हेच मी भाग्य समजतो, असे सुनील सांगतो. जर आपल्याला परवानगी दिली असती तर आपण अयोध्या नगरीत अन्य ठिकाणीही रांगोळी काढली असती. एका दिवसाला दोन किलोमीटर रांगोळी आपण पाच तासात काढतो असे तो सांगतो. श्रीरामाच्या भक्तीने आणि स्वयंप्रेरणेने असे अनेक कलावंत अयोध्येत दाखल होत आहेत.
हेही वाचा :
- "पंतप्रधानांनी 'हृदय में श्रीराम' गीत शेअर करणं हा प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद": सुरेश वाडकर यांची ईटीव्ही भारतशी एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया
- कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये गुन्हा; भाजपाकडून यात्रा उधळण्याचा कट असल्याचा कॉंग्रेसचा आरोप
- "लहानपणी मला पण अशा घरात रहायला मिळालं हवं होतं", सोलापुरात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक