पुणे Shravan Somvar Bhimashankar Temple : सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं भीमाशंकर देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यानं मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आज श्री क्षेत्र भीमाशंकरला पहाटेची महाआरती करण्यात आली. यावेळी मुख्य शिवलिंगाला भस्म चोळण्यात आला. त्यानंतर बेल-भंडारा वाहून शिवलिंगाची पूजा करण्यात आली. मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, डमरु, नगाडा, आणि शंखनाद करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं.
तब्बल 71 वर्षांनंतर जुळून आला योग : तब्बल 71 वर्षांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावणाची सुरुवात सोमवारी झाल्याचा पवित्र योग जुळून आला. यापुर्वी असा योग 1953 साली जुळून आला होता. तसंच यंदा श्रावणाची सुरुवात 5 तारखेला झाली असून महिन्याभरातही पाच सोमवार आहेत. या निमित्तानं भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर सर्वांना दर्शन मिळावं या हेतूनं पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर खुलं राहणार आहे.
कसं आहे हे मंदिर : भीमाशंकर देवस्थान हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलानं वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षांपूर्वीचं असून हे हेमाडपंथी बांधणीचं आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येतं. आजही ते नक्षीकाम जशास तसं जतन करण्यात आलंय. मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो.
दरवर्षी श्रावण महिन्यात पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भीमाशंकर मंदिरात येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं निसर्ग सौंदर्य फुललं असून जिकडे-तिकडे धबधबे खळखळून वाहताय. त्यामुळं निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि पवित्र अशा शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -
- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पौराणिक मातृलिंग दर्शनासाठी गर्दी; वर्षातून केवळ पाच वेळाच मिळते दर्शनाची संधी, घ्या दुर्मीळ शिवलिंग दर्शन - Kolhapur Ambabai Temple
- पहिला श्रावण सोमवार; परळी वैजनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी - Shravan 2024
- प्रसिद्ध 'घृष्णेश्वर" मंदिरात भाविकांची गर्दी; येथे दर्शन घेतल्याशिवाय १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होत नाही - Grishneshwar Temple Shravan 2024