रत्नागिरी MLA Yogesh Kadam : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पुन्हा पडायची इच्छा असेल, तर त्यांनी निवडणुकीला उभं रहावं, असं आव्हान खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी दिलं आहे. ते आज खेडमध्ये बोलत होते. मागच्या वेळेला गीतेंचं मी स्वतः काम केलं. योगेश कदम नसते, तर दापोली विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना लिड मिळाली नसती. आजपर्यंत त्यांनी 'कुणबी' म्हणून निवडणुका लढवल्या आहेत. इतके वर्ष ते मंत्री होते, मात्र त्यांच्यामार्फत एकही उद्योग रायगड मतदारसंघात आला नाही. फक्त गावा-गावात त्यांनी मंदिरं बांधली. त्यांनी काय केलं, याचं उत्तर त्यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत मिळालं आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा पडायची इच्छा असेल तर त्यांनी पुन्हा उभं राहावं, असं कदम यांनी म्हटलंय. यावेळी महायुतीच्या उमेदवाराला दापोली मतदार संघातून 55 ते 60 हजारांची लिड मिळेल, असा दावा देखील आमदार योगेश कदम यांनी केलाय.
विद्यमान खासदारांनाच तिकीट : लोकसभा निवडणुकीत 400 चा आकडा पार करायचा असेल, तर महायुतीमधील समन्वय आणखी दृढ करावा लागेल. रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळं विद्यमान खासदारालाच तिकीट दिलं जातं, हे आजपर्यंत घडत आलेलं आहे. उमेदवारीची मागणी करण्यात काही गैर नाही, पण निवडणूक जिंकण्याची गणितं देखील बघितली पाहिजेत. एकदा उमेदवार जाहीर झाले की आम्ही सगळे एकत्र काम करू, असा विश्वास योगेश कदम व्यक्त केला.
शिवसेना-राष्ट्रवादीत चांगला समन्वय : शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यातला राजकीय वाद जवळपास संपुष्टात आलेला आहे. महाविकास आघाडीत असताना दोघांमध्ये टोकाचे वाद होते. याबाबत बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये असताना आमच्यात हेवेदावे होते. मात्र, सुनील तटकरे यांचा आमच्या कार्यकर्त्यांमधील समन्वय नक्कीच चांगला होत आहे. त्याचं संपूर्ण श्रेय तटकरे यांना जातं. ज्यावेळी अजित पवार महायुतीत आले, त्यावेळी तटकरेंनी मला संपर्क करत आपल्याला एकत्र येत कोकणासाठी काम करायचं असल्याचं सांगितलं. त्यामुळं आपले हेवेदावे बाजूला ठेवत आम्ही काम करतोय, असं योगेश कदम म्हणाले.
मुख्यमंत्री दापोली दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 मार्च रोजी दापोली दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते मतदार संघातील सुमारे 400 कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दापोली मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली होती. त्यापैकी ऐतिहासिक वारसा असलेले हर्णे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यासाठी 205 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात 100 खाटांचं नवीन रुग्णालय बांधण्यात येतय. त्यासाठी 20 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी 98 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याकोण फाटा ते विसापूर रस्त्यासाठी 35 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते रामदास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं आ. योगेश कदम म्हणाले.
हे वाचलंत का :