सातारा - सातारा : साताऱ्यातील आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, मनोज घोरपडे (महायुती), आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील (महाविकास आघाडी) या दिग्गजांनी तर पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष म्हणून विराट शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दिग्गजांनी भरले अर्ज : महाराष्ट्राची ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक परंपरा सर्वांना माहिती आहे. गहारांचा प्रदेश, अशी महाराष्ट्राची ओळख नाही. तमाम जनता आणि समविचारी पक्ष महाराष्ट्राला लागलेला गद्दारीचा डाग पुसून काढण्यासाठी प्रयत्न करतील, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दोन विचारधारांची लढाई : कराड दक्षिणमधून साधेपणाने अर्ज दाखल केल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सात-आठ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असले तरी ही लढाई दोन विचारधारांची आहे. ती विचारधारा टिकविण्याकरिता आणि कराड दक्षिणमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ नये, याकरिता आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
मविआला ६५ टक्क्यापेक्षा जास्त जागा मिळतील : लोकसभेतील यशाचा दाखला देत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेन महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत दिलं. ६५ टक्के जागा निवडून दिल्या. विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला ६५ टक्क्यापेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
मविआतील तिन्ही पक्ष, मित्र पक्षांमध्ये समन्वय : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमच्या मित्रपक्षांमध्ये समन्वय झालेला आहे. आम्ही सगळे मिळून जातीयवादी प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रचार करणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्रात आम्ही शिवछत्रपतींचा आदर्श आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत. कराड दक्षिणमधील जनता मागील दोन निवडणुकीप्रमाणे यंदाही आशिर्वाद देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -