छत्रपती संभाजीनगर Aurangabad Lok Sabha Result 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या पारंपरिक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणानं बाजी मारली. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी चांगली आघाडी घेत विजय मिळवला. त्यांना तब्बल 1 लाख 34 हजार 650 मतं मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहिला असला, तरी मात्र मूळ शिवसेनेचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेनं शिवसेनेचाच पराभव करत हा विजय मिळवला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडत्या मतदार संघात त्यांच्या मुलाच्या गटाला नाकारल्याचं पाहायला मिळालं.
पहिल्या फेरीपासून संदिपान भुमरे यांना आघाडी : मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले. एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली आणि या सर्व फेऱ्यात संदिपान भुमरे हे आघाडीवर राहिले. त्यांची आघाडी तोडण्यात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना अपयश आलं. त्यामुळेच त्यांना 1 लाख 34 हजार 650 इतक्या मताधिक्यानं विजय मिळवणं शक्य झालं.
असं झालं मतदान :
- औरंगाबाद लोकसभा 2024 अंतिम
- निकाल संदिपान भूमरे (शिवसेना) 4 लाख 76 हजार 103
- चंद्रकांत खैरे (ऊबाठा शिवसेना) - 2 लाख 93 हजार 450
- इम्तियाज जलील - ( एमआयएम ) 3 लाख 41 हजार 480
- अफसर खान (वंचित) 69 हजार 266
धक्कादायक निकाल : 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर झालेल्या सर्वेत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे निवडून येतील, अशी खात्री निर्माण झाली. 2019 लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव, एकनाथ शिंदे यांनी पुकारलेला बंड त्यामुळे निर्माण झालेली सहनभुती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची साथ आणि संदिपान भुमरे यांचा मतदार संघ औरंगाबाद लोकसभा मतदार संघात नसणं, अशा काही मुद्द्यांवर खैरे जिंकतील असं वाटत होतं. मात्र अचानक निकाल वेगळा लागल्यानं मोठा धक्का अनेकांना बसलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा छुपा पाठिंबा, शेवटच्या काही दिवसात केलेलं आर्थिक नियोजन, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मागील दोन वर्षात बांधलेला मतदार संघ, त्यानंतर केलेला प्रचार यामुळे संदिपान भुमरे विजयी झाल्याचं बोललं जातंय.
इम्तियाज जलील यांना वंचितमुळे धक्का : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्षात प्रमुख लढत झाली. या लढतीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा जवळपास साडे चार हजार मतांनी पराभव झाला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी राज्यात राजकीय विश्लेषकांना धक्का देत विजय मिळवला. मात्र हे यश त्यांच्या एकट्याचं नव्हतं, कारण पहिल्यांदाच राज्यात वंचित बहुजन आघाडीकडून नवीन समीकरण उदयास आल्यानं हा निकाल लागला. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत 'वंचित' पक्षानं स्वतंत्र उमेदवार दिला. प्रचार सभांमध्ये एमआयएम पक्षानं वंचित नेते प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना न मागता पाठिंबा दिला. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघात फायदा होईल, असं पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांना वाटत असावं. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पाठिंब्याचा वंचितला फायदा झाला नाही. मात्र वंचित पक्षानं दिलेले उमेदवार अफसर खान यांनी तब्बल 69087 मतदान घेत जलील यांचं मताधिक्य कमी केलं. वंचितचे अनेक मतदार भुमरे यांच्याकडं वळले, त्यामुळे इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
चंद्रकांत खैरे हिमालयात कधी जाणार, सोडवायला जाऊ : जनतेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय केला, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार संदिपान भुमरे यांनी दिली. "पराभूत झाल्यावर हिमालयात जाईल, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. त्यामुळे आता ते कधी जाणार आहेत, याची तारीख वेळ कळवा, म्हणजे आम्ही सोडवायला येऊ," अशी टीका देखील त्यांनी केली. विजय निश्चित होताच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार इम्तियाज जलील यांनी भुमरे यांचं अभिनंदन करत गळाभेट घेतली. त्यांना लोकसभेबाबत काही मदत लागल्यास आपण करू, असं देखील जलील यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- स्वातंत्र्यानंतर साताऱ्यात पहिल्यांदाच भाजपाचं कमळ फुललं, उदयनराजेंचा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला धक्का! - Lok Sabha Election Results 2024
- देशातील सर्वात तरुण खासदार असलेल्या शांभवी चौधरी कोण आहेत? काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव - Shambhavi Choudhary
- महाराष्ट्रात धक्कादायक निकाल; 'या' उमेदवारांना दाखवला घरचा रस्ता, निकालाचं विश्लेषण वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election 2024 Results