पुणे Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती (Shivaji Maharaj Jayanti) आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयंती सोहळा पार पडला. शिवनेरीवर 2000 सालापासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा पायंडा सुरू झाला. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे.
शिवजयंती तारखेनुसार का : पूर्वी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जायची. त्यामुळे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार ती दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी यायची. पुरुषोत्तम खेडेकर यांनी जगभरात शिवरायांची महिमा पोहचावी, यासाठी 1997 पासून शिवजयंती तारखेनुसार साजरी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होऊ लागली.
विलासराव देशमुखांनी परंपरा सुरू केली : कालांतरानं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रेखाताई खेडेकर यांनी शिवजयंतीचा मुद्दा विधानसभेत मांडला आणि ती 19 फेब्रुवारीलाच का साजरी करावी हे समजावून सांगितलं. त्यानंतर शासनानं 9 फेब्रुवारी 2000 रोजी कॅबिनेटमध्ये निर्णय घेत सर्वांना शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करण्याचं आवाहन केलं. त्यावर्षी मुख्यमंत्र्यानी शिवजयंतीला स्वत: शिवनेरी किल्ल्यावर येत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
शिवरायांना मानवंदना : शिवनेरीवर आज सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यानंतर पोलीस बँड पथकानं राष्ट्रगीत तसेच 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली. यावेळी पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून शिवरायांना मानवंदनाही देण्यात आली. शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यानिमित्त सुमारे 1100 पोलीस आणि मोठ्या प्रमाणावर होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हे वाचलंत का :