मुंबई Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीनं माटुंगा परिसरात राहणाऱ्या राधा पिल्लई यांना 49 लाख 35 हजार रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना सुरत इथून अटक केली. हे दोन्ही आरोपी हवालाद्वारे दिल्लीतील पिता-पुत्रांकडे पैसे पाठवत होते. पिता-पुत्र हे पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये बदलून दुबई आणि हाँगकाँगला पाठवत असल्याचं समोर आलंय. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुबईत बसलेला एक चिनी व्यक्ती आहे. माटुंगा पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
सुरत इथून दोन आरोपींना अटक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन परतावा जास्त मिळवण्याचं आमिष दाखवून तक्रारदार राधा पिल्लईंना भामट्यांनी 49 लाख 35 हजार रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 403, 420, 467, 468, 471, 34 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तपास अधिकारी दिगंबर पगार यांनी फसवणूक करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्याचा तपास केला. त्यानंतर दोन आरोपींना गुजरात राज्यातील सुरत इथून ताब्यात घेतलंय. आशिष धनजीभाई घंटाला (32) आणि संजयभाई अमृतभाई पटेल (43) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. माटुंगा पोलिसांना आरोपींच्या चौकशीत आठ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, पाच विविध बँकेचे चेक बुक, पाच मोबाईल आणि 10 सिमकार्ड सापडले आहेत. तसंच विविध बँकेच्या खात्यातून चेकद्वारे काढलेले पैसे हवाला मार्फत मिनीबाजार, सुरत इथून दिल्ली पाठवत असल्याचंही आढळून आलंय.
25 कोटींचा अपहार : याप्रकरणी दिल्लीतूनही दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कवल रमेश मल्होत्रा (45) आणि त्याचा मुलगा आयुष्य कवल मल्होत्रा अशी त्यांची नावं आहेत. हे दिल्लीतील दोन आरोपी हवालामार्फत पैसे स्वीकारुन ते क्रिप्टो करन्सीत रुपांतर करुन दुबई आणि हॉंगकॉंग इथं पाठवत होते. दुबईत असलेल्या मुख्य आरोपीनं तीन महिन्याच्या कालावधीत 50 बँक खात्याचा वापर करुन 25 कोटी रुपयांचा अपहार केलाय. माटुंगा पोलिसांना केवळ यापेकी 20 लाख रक्कम गोठवण्यात यश आलंय. कोणीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नये. सतर्क राहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाला बोलू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
हेही वाचा :