छत्रपती संभाजीनगर Raj Thackeray On Sharad Pawar : राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नावानं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे विष कलवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. निवडणुकीपूर्वी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. "माझ्या दौऱ्यात अडथळे निर्माण केले, तर माझं मोहळ उठेल. मी तुमची एकही सभा होऊ देणार नाही. समाजात विष कालवून कोणतं राजकारण करायचं? समाजात भांडणं लावण्याचं काम करू नका", असं ते म्हणाले. अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडत नाहीत. तसं वक्तव्य त्यांनी कधीही केलं नाही, अशी पाठराखण त्यांनी अजित पवारांची केलीय.
आमची भूमिका पहिल्यापासून एकच : "सोलापूरपासून आमच्या दौऱ्याला सुरुवात झाली. दिवाळीच्या आसपास निवडणुका होतील. त्यासाठी आम्ही दौरा करत आहोत. विदर्भात दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. मराठवाड्यातील दौरा पूर्ण झाला आहे. माझ्या नियोजनात बदल केला असून दौरा मी आटोपलेला नाही. यानिमित्तानं मराठवाड्यातील राजकारण पाहात आलं. काही गोष्टी दिसून आल्या. आरक्षणाबाबत माझा विरोध ही बातमी मुळात दिली कोणी हा प्रश्न आहे. 2006 पासून आमची भूमिका एकच आहे. पक्ष स्थापनेपासून आर्थिक निकषावरच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिका आम्ही नेहमीच मांडली. खरंतर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आरक्षणाची गरज नाही. बाहेर राज्यातील लोकांना नोकरी मिळते, मग आपल्या लोकांसाठी कोटा ठरवला, तर आरक्षणाची गरज निर्माण होणार नाही. सर्वात आधी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. आर्थिक दुर्बल घटकांना ते, मिळावं. जाती विषयी राजकारण करून विष कालवण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा विषय कुठंही नव्हता. मात्र त्यांच्या नावानं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखे लोक राजकारण करतात. शरद पवारांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे", अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
लोकसभेत तुम्हाला मतदान नाही : "लोकसभा निवडणुकीत मतदान मिळालं म्हणजे विधानसभेला मिळेल, असं होत नाही. लोकसभेत लोकांनी तुम्हाला मतदान दिलं नाही. मात्र तुम्हाला मोदी आणि शाह यांच्या विरोधातलं मतदान तुम्हाला मिळालं. ते तुम्ही मिळवलेलं नाही. लोकसभेत जशी मतं मिळाली, तशी विधानसभेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषता मराठवाड्यात दंगल भडकवण्याचा प्रयत्न होणार आहे. मी दौऱ्यावर असताना अडचण निर्माण केली जात आहे. मात्र, माझ्या नादी लागू नका, मी तुमची एकही सभा होऊ देणार नाही. 20 तारखेला माझा दुसरा दौरा चालू होत आहे. तुमची विघ्नं तुमच्याच गळ्यात घालीन, असा" इशारा राज ठाकरे यांनी दिला.
आरक्षण का मिळवलं नाही : "मुंबईत आरक्षणाबाबत मोर्चा आला होता. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षण देण्याची मागणी केली. जर सर्वच पक्ष त्या मुद्द्यावर एकमत आहेत, मग आरक्षण का मिळवता आलं नाही. केंद्रात गेल्या दहा वर्षापासून बहुमताचं सरकार आहे. मग हा प्रश्न मार्गी का लावला नाही? असं राज ठाकरे म्हणाले. मुळात आरक्षण देणं ही तांत्रिक अडचण आहे. जर इकडं दिलं, तर इतर राज्यांमध्ये सुरू असलेली मागणी देखील अडचणीची ठरू शकते. मात्र, आता लोकांनीच सतर्क राहिलं पाहिजे, हे विष कालवण्याचा प्रयत्न होत आहे. तीन महिन्यांनी निवडणुका झाल्या की त्यानंतर हे कोणीही येणार नाहीत, मी असा महाराष्ट्र कधीच पहिला नव्हता", अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
'हे' वाचलंत का :