अहमदनगर Sharad Pawar Question About Onion : लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलंय. आता विधानसभेला साथ द्या, असं आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथे करत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलयं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवारांचा पहिलाच दौरा : शरद पवार यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथे स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंती महोत्सवा निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली; तत्पूर्वी पवार यांचं जेसीबीने फुलांची उधळण करत आणि भलामोठा हार क्रेनने घालत जोरदार स्वागत केलं गेलं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि राष्ट्रवादीकडून निवडूण आलेल्या आमदार किरण लहामटेनी पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवारांचा हा पहिलाच अकोले दौरा असल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलयं.
कांद्याला भाव मागण्याचा अधिकार नाही का? : यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा चांगलाच समाचार घेतलाय. कांद्याला दर मिळत नाही. मोदींच्या नाशिकच्या सभेत एक शेतकरी उठला आणि म्हणाला, "तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय. माझ्या कांद्याला भाव द्या." पोलिसांनी त्याला पकडलं आणि आत टाकलं. कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही. हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये समोर आलं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
लोकसभेनं देशाला नवी दिशा दिली- पवार : शरद पवार पुढे म्हणाले की, देश आज वेगळ्या संकटातून जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंद्याकडे बघितलं जातं; मात्र आज त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचे पीक घेतो. त्याला रास्त दर मिळावा एवढीच मागणी असते." "पाच वर्षांपूर्वी काॅंग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे. लोकसभेनं एक नवी दिशा देशाला दाखवली आहे. सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे. आता तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही.
सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार हवयं : तुम्ही मला अनेकदा निवडून दिलयं. आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचं आहे. ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवीय, असं म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं. यात बरोबरीनं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार बरोबर गेलेल्या आमदार किरण लहामटे यांचा तिखट शब्दात समाचार घेत सोबत राहिलेल्या अमित भांगरे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा:
- "...तेव्हा महिलांना 50 रुपये तरी दिले का?"; खासदार अनिल बोंडेंची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका - Majhi Ladki Bahin Yojana
- विधानसभा जागा वाटपाबाबत महायुतीत संभ्रमच? भाजपा राज्यात १६० ते १७० जागा लढण्याच्या तयारीत - Assembly Elections 2024
- लोकसभेला वाजलेल्या 'पिपाणी'चा आवाज विधानसभेत ऐकायला मिळणार नाही - EC On Pipani Symbol