कोल्हापूर Uddhav Thackeray : कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज आणि आमचे आमच्या आजोबांपासून ऋणानुबंध आहेत याचा मला आनंद आहे. याही पिढीत आमचे संबंध घनिष्ठ राहिले आहेत. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांमागे शिववसैनिक पूर्ण ताकदीनं उभा राहील असं मी महाराजांना वचन दिलंय. आम्ही प्रचारासोबत विजयाच्या सभेलाही येणार असून या पुढच्या संघर्षासाठी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेतले आहेत, अशा भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे शाहू महाराजांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शाहू महाराजांसोबत बंद खोलीत चर्चा : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (21 मार्च) मिरज येथे जाहीर सभा होत आहे. तत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचं आगमन झालं. यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निश्चित झालेले उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापुरातील जुना राजवाडा येथे जाऊन भेट घेतली. राजवाडा येथे शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट झाली. सुमारे अर्धा तास उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे यांनी शाहू महाराजांशी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. यावेळी राजघराण्यातील सदस्य माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होते.
आमचं जगजाहीर असतं : उद्धव ठाकरे यांनी श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेण्यामागे माझा स्वार्थ असल्याचं सांगितलं. यापुढच्या संघर्षात जो आम्ही लढतो आहे त्यात विजय मिळावा यासाठी आशीर्वाद घेण्यासाठीही आलेलो आहे. आमचं जगजाहीर असतं. यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही. कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी शिवसैनिक शाहू महाराजांचे निष्ठेने काम करतील, असं सांगून सांगली लोकसभेच्या जागेवर बोलणं मात्र ठाकरेनी टाळलं. सायंकाळी होणाऱ्या मिरज येथील सभेत ठाकरे कोणावर निशाणा साधतात याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसैनिकांची घोषणाबाजी : श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजवाड्याबाहेर आल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून सोडला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असताना 1998 साली नवीन राजवाडा येथे आलो होतो, अशी आठवणही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. शाहू महाराजांच्या भेटीनंतर जाहीर सभेसाठी उद्धव ठाकरे मिरजेकडे रवाना झाले.
हेही वाचा :