पुणे - ज्येष्ठ संस्कृत तज्ञ, शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, प्रकाशक, भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष पं. वसंत अनंत गाडगीळ (वय 94) यांचं आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर सांस्कृतिक चळवळीतील एक झपाटलेलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, आशी प्रतिक्रिया साहित्य तसंच विचारवंतांच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
वसंतराव गाडगीळ (Vasantrao Gadgil) यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित केलं होतं. तसंच संस्कृततज्ञ असलेल्या पंडितजींचे पुण्यातील असंख्य धार्मिक-सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी जवळचे संबंध होते. हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक असलेल्या पंडितजींनी ऋषीपंचमीला समाजातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतला होता. त्यांनी काही वर्षे पत्रकारिता देखील केली. शारदा या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी असंख्य पुस्तकांचे प्रकाशन केले होते. त्यातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे ग. बा. पळसुले यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा असलेले महाकाव्य "वैनायकम" हे आहे. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पं. वसंतराव गाडगीळ यांच्या कार्याची विशेष दखल घेतली होती. संस्कृतचं एक चालतं बोलतं विद्यापीठ गेलं, असंच त्यांच्याबाबत म्हणावं लागेल.
पुण्यातील साहित्य क्षेत्रात वसंतराव गाडगीळ यांचं एक मोठं नाव होतं. त्यांच्या कार्याचा गौरव नेहमीच होत आलेला आहे. त्यांच्या जाण्यानं संस्कृत भाषा तसंच धार्मिक विचारांचा वारसा काळाच्या पडद्याआड गेला आहे.