मुंबई : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना यंदाचा हा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे समीक्षात्मक पुस्तक 'विंदांचे गद्यरुप' या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
'विंदाचे गद्यरुप' या पुस्तकाला पुरस्कार : सुप्रसिध्द मराठी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा साहित्य अकादमीने केली आहे. रसाळ हे मराठी साहित्यसृष्टीत प्रामुख्याने समीक्षक म्हणूनच ओळखले जातात. यानिमित्तानं रसाळ सरांचं ईटीव्ही भारतनं दूरध्वनीवरुन अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतरची पहिली एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया ईटीव्ही भारतला दिली.
" साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यातील मिळणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. लक्ष्मण शास्त्री, बा. सी. मर्ढेकर अशा मोठ्या व्यक्तींना आजपर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. तो मलाही जाहीर झाला याचा मला विशेष आनंद झाला आहे". - सुधीर रसाळ, ज्येष्ठ साहित्यिक
असं आहे पुरस्काराचं स्वरूप : साहित्य अकादमीच्या वतीनं वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या पुरस्कारांना मान्यता देण्यात आली. हे पुरस्कार १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना यासाठी निवडण्यात आलं. येत्या ८ मार्च २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ताम्रपट, शाल आणि १ लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे.
हेही वाचा -