अमरावती Chikhaldara European Cemetery : व्यापारी म्हणून आले आणि सत्ताधीश झालेल्या ब्रिटनमधील काही ब्रिटिश कुटुंब थेट सातपुडा पर्वत रांगेत घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासी जमातीसाठी काम करत असताना सातपुड्याच्या मातीतच विसावलेत. चिखलदरा येथील उंच टेकडीवरील स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली असली, तरी मेळघाटातील इंग्रजांच्या कार्याचा त्यात मोठा इतिहास दडलाय. या इतिहासाचे पुरावे आज इंग्लंडमध्ये असले, तरी विदर्भातील थंड हवामान असलेलं चिखलदरा ही एकेकाळी इंग्रजांची वसाहत होती, याची साक्ष ही स्मशानभूमी देते.
1823 मध्ये चिखलदऱ्यात आले इंग्रज : चिखलदऱ्याचा उल्लेख महाभारतात आहे. अज्ञातवासात असताना पांडवांनी वैराट राजाच्या दरबारात 12 वर्षे काढलीत. वैराट राजाचे राज्य म्हणजे आजचे चिखलदरा. गोंड राजा आणि पुढे मुस्लिम राजांची सत्ता चिखलदऱ्यात असल्याची नोंद इतिहासात आहे. 1823 मध्ये हैद्राबाद रेजिमेंटचा कॅप्टन रॉबिन्सन हा पहिला इंग्रज अधिकारी होता, जो भयंकर वन्य प्राणी आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या चिखलदरा भागात पोहोचला. इंग्लंडमध्ये असणारं वातावरण चिखलदऱ्यात आहे, असं जाणवल्यानं कॅप्टन रॉबिन्सनच्या नेतृत्वात चिखलदरा परिसराचा आधुनिक दृष्ट्या विकास होण्यास सुरुवात झाली.
चिखलदरा येथं इंग्रजांची वसाहत : 1823 मध्ये इंग्रज पहिल्यांदा चिखलदऱ्यात आले. त्या वेळी चिखलदराला 'चिखलदा' असं संबोधलं जायचं. सातपुडा पर्वत रांगेतून अनेक नदी, नाले पार करत नागमोडी वळण घेत चिखलदरा गाठावं लागतं. त्या काळात इंग्रजांनी चिखलदरापर्यंत जाण्यासाठी नवा मार्ग शोधला. पुढे इंग्रजांनी चिखलदऱ्यासह संपूर्ण मेळघाटात रस्त्यांचे जाळे विणले. चिखलदरा आणि मेळघाटच्या अनेक भागात सुरुवातीला ख्रिस्ती मिशनरी मोठ्या संख्येनं दाखल झाल्या. या भागातील आदिवासींसाठी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या वतीनं कामं सुरू झाली. हळूहळू चिखलदरा हे प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. चिखलदरा येथील वन विभागाचं कार्यालय, वन अधिकाऱ्यांचे बंगले, कर्मचारी वसाहती, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आणि जिल्हा परिषदेचे विश्रामगृह हे सारं इंग्रजांनीच उभारलं. चिखलदरा येथील पोलीस ठाणेही इंग्रजांच्या काळातलं आहे.
132 वर्षांपर्यंत इंग्रजांची वसाहत : 1823 मध्ये पहिल्यांदा चिखलदऱ्यात पोहोचलेल्या इंग्रजांनी नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1955 पर्यंत म्हणजे सुमारे 132 वर्षे चिखलदऱ्यात आपली वसाहत निर्माण केली. सुरुवातीला मेळघाटच्या घनदाट जंगलात असलेली छोटी-मोठी राज्यं इंग्रजांनी ताब्यात घेतली. त्यानंतर मेळघाट जंगलाचं नियोजन, रस्ते बांधणी, नदी नाल्यांवर पूल बांधणं आदी कामे हाती घेतली. मेळघाटाबाहेरील लोकांना मेळघाटात येणं सोपं व्हावं, यासाठी इंग्रजांनी कामं सुरू केली असतानाच चिखलदरा परिसरात ब्रिटिशांची वसाहत वाढू लागली. ब्रिटनमधील 30 ते 40 कुटुंबं चिखलदऱ्यात स्थायिक झाली. चिखलदरा व आसपासच्या परिसरात ख्रिश्चन मिशनरींची काम जोमानं सुरू झाली. ब्रिटिशांची वसाहत असलेलं चिखलदरा इंग्रजांचं पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ लागलं.
उंच टेकडीवर शांततेच्या ठिकाणी स्मशानभूमी : इंग्रज कुटुंबं चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक होऊ लागली. या भागातील कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी गाविलगड किल्ल्याच्या मागे एका उंच टेकडीवर स्मशानभूमी बांधली. एक उंच दगडी भिंत आणि ख्रिश्चन वास्तुकलेच्या खुणा असलेलं भव्य प्रवेशद्वार स्मशानभूमीला चिन्हांकित करतं. घनदाट जंगलानं वेढलेल्या या स्मशानभूमीत बाराही महिने थंड वारा वाहत असतो.
स्मशानभूमीमध्ये संगमरवरी कबर : स्मशानभूमीत इंग्रजांनी खास संगमरवरी कबर आपल्या प्रियजनांसाठी तयार केल्या. आज या ठिकाणी सुमारे 30 ते 40 कबरी पाहायला मिळतात. यातील अनेक कबरींची दुरवस्था झाली. विशेष म्हणजे या कबरींवर ती नेमकी कोणाची, त्यांच्या जीवनकार्याचा उल्लेख आहे. ही कोरलेली अक्षरं आता नीट वाचताही येत नाहीत. लहान बाळापासून वृद्ध व्यक्तींना देखील या ठिकाणी मृत्यूनंतर पुरवण्यात आलं, असा उल्लेख काही कबरीवरील अक्षर निरखून वाचली असता लक्षात येतं.
माजी शिक्षक व माझे नगरसेवक असलेले चिखलदरा येथील रहिवासी 80 वर्षीय जी. जे डॅनियल यांनी सांगितलं की, "आजही काही कुटुंबं इंग्लंडहून थेट चिखलदरा येथील स्मशानभूमीत आपल्या प्रियजनांच्या स्मृतिदिनानिमित्त येतात. पेट मेजर इमिली यांच्या कुटुंबातील सदस्य बऱ्याचदा या ठिकाणी आलेत," असं देखील त्यांनी सांगितलं.
यांच्या आहेत कबर : स्मशानभूमीत असणाऱ्या कबरींपैकी 26 मे 1875 ला निधन झालेले आर. एस सीन्सलेयर, 22 मे 1888 ला अखेरचा श्वास घेणारे लेसली सीमोयर सौडर्स या अधिकाऱ्याची कबर आहे. 11 सप्टेंबर 1918 ला मृत पावलेली कु. थिओडोसिया जी पेडलो, 28 ऑक्टोबर 1951 ला निधन झालेल्या एमिली ह्युघेस या महिलेची कबर या ठिकाणी आहे. त्यांच्या कबरीवर त्यांची नावं आणि मृत्यूच्या तारखा कोरलेल्या आढळतात. एमिली ह्युघेस या 1908 ते 1951 दरम्यान मेळघाटात कोरकू हिल मिशनमध्ये काम करीत होत्या. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
स्मशानभूमी उद्ध्वस्त : चिखलदरा येथील उंच तटबंदीवर 1870 च्या दशकात स्मशानभूमी बांधण्यात आली. 1955 पर्यंत या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखलदरा येथील इंग्रजांच्या वास्तव्याची आठवण असलेल्या या स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था आहे. या स्मशानभूमी शेजारी लावलेली संगमरवर दगडांची फळकं तोडून नेण्यात आले. अनेक कबरी खोदल्या गेल्या. या स्मशानभूमीला दगडी भिंती आणि सुंदर कुंपण होते, पण आता ते भग्नावस्थेत आहे. ख्रिश्चन संस्कृतीची खूण असलेल्या स्मशानभूमीचे प्रवेशद्वारही तुटलेले आहे. इथल्या अनेक कबरी दाट झाडीत लपलेल्या आहेत.