मुंबई : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागात सरकारी कार्यालयांमध्ये योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. तसंच अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर येत आहे. या योजनेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, असं शासनाच्या वतीनं यापूर्वी सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी सातारा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिलीय.
सातारा पॅटर्न राबवणार : "महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठंही जाण्याची गरज नाही. ही योजना यशस्वीपणं राबवून महिलांचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही सातारा पॅटर्न राबवू. या पॅटर्ननुसार आमची पथकं घरोघरी जातील. ते घरोघरी जाऊन शक्ती ॲपवर अर्ज भरणार आहेत. त्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. त्यामुळं महिलांना कुठंही जावं लागणार नाही, कुठंही अर्ज करण्याची गरज भासणार नाही", असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. सोमवारी ॲपचं लोकार्पण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महिलांच्या घरी जावून भरणार अर्ज : "सातारा पॅटर्न, सुरुवातीला सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत पथकं तयार करण्यात आली असून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, तलाठ्यांचा या पथकात समावेश आहे. पथकाच्या सदस्यांना विभागनिहाय 50 कुटुंबं ठरवून देण्यात आली आहेत. पथकातील सदस्यांनी गावात महिलांच्या घरी जावून नारीशक्ती ॲपवर सदरील योजनेचा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळं या योजनेला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली आहे. योजनेत कुठंही आर्थिक व्यवहार होत असल्यास त्यावर कारवाई केला जाणार" असं देसाई म्हणाले.
'हे' वाचलंत का :
- "सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न..."; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप - Maharashtra Monsoon Session 2024
- तलाठ्याची ग्रामस्थांसोबत अरेरावीची भाषा, माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीदरम्यान घडला प्रकार - Talathi argued with villagers
- शिर्डी नगरपरिषद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांची लूट; रहिवासी दाखल्यासाठी 50 रुपयांची मागणी - Mukhyamantri Ladki Bahin Yojana