सातारा Satara Car Accident : साताऱ्याहून कास पठाराकडं कारमधून फिरण्यासाठी जात असताना कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली. यात दोन तरुण जागीच ठार झाले, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (4 मार्च) सकाळच्या सुमारास झाला. फैजल शेख (वय 16, रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि सोहेल अन्सारी (वय 18, रा. बुधवार पेठ, सातारा) अशी मृत तरूणांची नावं आहेत. तर जखमी तिघांना काही नागरिकांनी तातडीनं साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
फिरायला जाणं बेतलं जीवावर : कारमधून फिरण्यासाठी पाच तरुण सोमवारी सकाळी साताऱ्याहून कास पठाराकडं निघाले होते. कास पठार हद्दीतील हॉटेल वुड्स रिसॉर्टजवळ आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी कारचे तुटलेले पार्ट्स विखुरले होते. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यातील एका गंभीर जखमी तरुणाचा काही वेळात जागीच मृत्यू झाला.
अपघातस्थळी भीषण दृश्य : घटनास्थळाचं दृश्य थरकाप उडविणारं होतं. कारचा चक्काचूर झाला होता आणि अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. काही नागरिकांनी जखमी तिघांना तातडीनं साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सातारा जवळचे कास पठार हे जगप्रसिद्ध आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणूनही या पठाराला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. या पठारावरील फुलांचे आणि निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी सिझनमध्ये वर्दळ असते. वळणा-वळणाचे रस्ते असल्यानं काहीवेळी या ठिकाणी अपघात होत असतात.
हेही वाचा -