सातारा - उन्हाळी सुट्टीत मुले घराबाहेर फिरायला जाताना त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली. सातारा जिल्ह्यातील एका दुर्घटनेमुळे पालकांना मुलांच्या बाबात अधिक सजग राहावं लागणार आहे. पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुली कोयना धरणाच्या जलाशयात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे गावात घडली. चारपैकी दोघींना वाचवण्यात यश आलं. मात्र दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२) आणि सोनाक्षी तानाजी कदम (वय १३, रा. वाळणे, ता. महाबळेश्वर) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात रविवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. वाळणे ( ता. महाबळेश्वर) गावातील १२ ते १३ वयोगटातील चार मुली दुपारी शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या. पोहत असताना चौघीही पाण्यात बुडाल्या. आजुबाजूच्या लोकांनी चौघींनाही जलाशयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीचा बुडून मृत्यू झाला होता. अन्य तिघींना उपचारासाठी तापोळा येथे आणण्यात आलं. तापोळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वरला पाठविण्यात आलं. महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी एका मुलीचा मृत्यू झाला, तर सृष्टी सुनील नलवडे (वय १३) आणि आर्या दीपक नलवडे (वय १२), या दोघींना वाचविण्यात यश आलं. या दुर्घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
काय काळजी घ्यावी?
- नदी, तलाव अथवा धरण अशा ठिकाणी मुलांना एकटे पाठवू नये. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. त्यामुळे अनोळखी ठिकाणी असलेल्या नदी अथवा तलावात पोहण्याचे टाळावे. पोहता येत असले तरी अतिउत्साह किंवा आत्मविश्वासाच्या भरात दुर्घटना टळू शकते. पाण्याच्या खोल प्रवाहात जाऊ नये. नेहमी दक्ष राहून पर्यटनाच्या ठिकाणी जावे.
हेही वाचा-