मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर) 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली. जगासह देशातील अनेक मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. "आपल्या देशाला आर्थिक विकासात आणि जगात मिळालेली प्रतिष्ठा यात रतन टाटांचं मोठं योगदान आहे. देश म्हणजे लुटण्याचं नाही, तर निर्मितीचं साधन असल्याचं म्हणत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलीय.
आमच्या हृदयात टाटा कायम राहतील : "उद्योगपतींच्या निधनानंतर कुणी हळहळत नाही, पण रतन टाटा हे असं व्यक्तीमत्व होतं की, ते देशातल्या घराघरात पोहोचलेलं नाव होते. ते गेल्यानं संपूर्ण देश हळहळतोय. टाटांनी आपल्याला भरपूर दिलं. उद्योगपतीला नफा आणि तोटा हे दोनच शब्द माहिती असतात. पण टाटा हे कमालीचे देशभक्त होते. आज उद्योगपतींसाठी देश हा लुटण्याचा खजिना आहे. पण टाटांसाठी देश हे निर्मितीचं साधन होतं. त्यांनी देश घडवला, त्यांनी आम्हाला, तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली. उद्योगपती असतानाही प्रत्येकाला ते आपल्या घरातील एक व्यक्ती वाटत राहिलं. जगामध्ये असं दुसरं उदाहरण नाही.सामाजिक कार्यातील आणि मुंबईसारखं शहर घडवण्यातील त्यांच्या योगदानाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. त्यामुळं आमच्या हृदयात टाटा कायम राहतील," अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांचं वर्णन केलं.
महिलांची फसवा फसवी सुरू : मध्यप्रदेशातील 'लाडक्या बहिणी योजने'च्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्यावर भोपाळ येथं गुन्हा दाखल करण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "गुन्हाच दाखल झालाय. लाडकी बहिण योजनेचं मध्य प्रदेशमध्ये काय आहे ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे. महाराष्ट्रात 'लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून महिलांची फसवा फसवी सुरू आहे. मतं विकत घेण्यासाठी 'लाडकी बहिणी योजना' आणलीय."
आदित्य ठाकरे पुन्हा विधानसभेत जातील : वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरू असून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न असल्याचं बोलले जात आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यावर मी मत व्यक्त करणं योग्य होणार नाही. मात्र, आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्क्यानं निवडून येतील आणि विधानसभेत जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा