पुणे Sanjay Raut On Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आज मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असं सचिन वाजे यांनी सांगितलं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, "भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी संत महात्मांचा आधार घेत आहे," असं वक्तव्य केलंय.
सचिन वाजे भाजपाचा प्रवक्ता : पुण्यात संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले, "भाजपा पराभवाच्या भीतीने विरोधकांवर हल्ला करण्यासाठी अशा संत महात्म्यांचा वापर करत असेल तर निवडणूक न लढताच त्यांनी पराभव मान्य केला आहे. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण यावर उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतोय. खून, दहशतवाद यातील एक आरोपी हा भाजपाचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे. हे असं देशात प्रथमच पाहायला मिळत आहे."
अँटिलिया प्रकरणातील दोन आरोपी 'मिंधे' गटात : ते पुढे म्हणाले, "ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले त्यात एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. यातील दोन मुख्य आरोपी हे पोलीस खात्यातील आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना क्लीन चिट देण्यात आली आणि जे दोन आरोपी होते ते सुटले असून ते 'मिंधे' गटात आहेत. ते त्यांच्यासाठी काम करत आहेत. कदाचित एक जण अंधेरी येथून निवडणूक देखील लढू शकतो. दुसरे महात्मा आहे ते अशा पद्धतीनं पत्र व्यवहार करून भाजपाचा प्रवक्ता म्हणून जेल मध्ये काम करत आहेत. राजकारणासाठी तसंच निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा गुंडांचा वापर करत असल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले."
भाजपाची क्रीमिनल वेब सिरीज : "आज भाजपाचे लोक जेल मधील गुंडाना फोन करत आहे. जेलमधून फोन येत आहे. भाजपा हे सर्व निवडणुकांसाठी करत आहे. भाजपाची ही क्रिमिनल वेब सिरीज आहे. मिर्जापूर नावाने ही वेब सिरीज सुरू आहे. अनिल देशमुखांना उत्तर देण्यासाठी खास तुरुंगातील गुंडांना बाहेर आणण्यात आलं आहे." असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
अटक होण्याआधी संजय राऊतांना मिळाली होती ॲाफर : तुमच्यावर कारवाई झाली तेव्हा काही ऑफर होती का? याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले, "मला अटक होण्याआधी मलाही ॲाफर आली होती. ही बाब मी राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवली होती. माझ्यावर दबाव येत आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू नका नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल, असा दबाव माझ्यावर आणण्यात आला होता. आता देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणूक हरणार आहेत." असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंवर टीका : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले, "मनसे ने सर्व जागा लढवण्याची घोषणा केली होती. आज मुख्यमंत्र्याची भेट घेत आहेत. कितनी बडी डील हो सकती है." असा टोला यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा
- "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze
- "ठाकरे आणि पवारांचे विधान...: पाहा ॲड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - Adv Prakash Ambedkar
- "भाजपाचा कार्यकर्ता महायुतीविरोधात लढणार..."; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला विधानसभेचा प्लॅन - Chandrashekhar Bawankule
- वेषांतरहून अजित पवार भडकले! सुप्रिया सुळेंसह संजय राऊत यांना दिलं खुलं आव्हान - Ajit Pawar On Supriya Sule