मुंबई Sanjay Raut vs Devendra Fadnavis : गाढवाला किती चंदन लावा, ते राखेत जाऊन लोळते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आज उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच पलटवार केला. मात्र "कट्यार काळजात घुसेल" या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर बोलताना त्यांनी चांगलीच मुक्ताफळं उधळली. "अगोदर कट्यार कमरेवर बांधायला शिका. आम्ही चाकू सुरीवाले आहोत. त्यामुळे आम्हाला कट्यारीची भाषा शिकवू नका, आमची कट्यार . . . " असा पलटवार त्यांनी केला.
भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, "काल शेवटी निवडणूक आयोगाचे आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या आदेशानुसारच निवडणूक आयोग काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात या निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले त्यावरुन निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची आहे, हे स्पष्ट होते. पक्षांतर विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालेलं असताना सुद्धा, निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली निर्णय दिले. त्यामुळे निवडणूक आयोग असला काय? किंवा नसला काय? या देशाला काही फरक पडत नाही," अशी टीका संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केली.
हा तर पंतप्रधान मोदी-शाहांचा नवीन डाव : "निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हे मोदी-शाहांचा नवीन डाव," असल्याचं संजय राऊत म्हणाले. "नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला नाही. मुळात त्यांची ही नेमणूकच अनैतिकतेच्या आधारावर केली होती. त्यांच्या जागी अजून एक नवीन व्यक्ती भाजपाचीच येईल, बाकी काही नाही. अरुण गोयल यांना सर्व नियम, कायदे आणि संविधान डावलून निवडणूक आयुक्त केले होते. याविषयी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टानं देखील त्यांच्या नियुक्तीविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हाही सरकारनं कोणतीच भूमिका घेतली नव्हती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. आता त्या रिकाम्या जागी भारतीय जनता पक्षाचाच कोणीतरी माणूस येईल," असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
आमची कट्ट्यार कुठे घुसेल माहीत पडणार नाही : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कोणाचा डंपर पलटी होतोय, हे आता कळेल. तुकोबारायांचं एक वाक्य आहे. "तुका म्हणे ऐशा नरा | मोजुनी माराव्या पैजारा..." आता भाजपाच्या नेत्यांना लोकं रस्त्यावरती मोजून पैजारा मारतील, असा प्रहार संजय राऊत यांनी भाजपा आणि फडणवीस यांच्यावर केला. आमच्यासोबत असताना स्वर्गसुखाचा आनंद घेत होते. आता दोन त्यांच्या बाजूला डंपर आहेत. त्यामुळं ते चिखलात लोळत आहेत. काही लोकं राजकारणात कट्यार आणि नटसम्राटाची भाषा करतात," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर केली आहे, असा प्रश्न राऊतांना विचारला असता, "आधी कट्यार कमरेवर बांधायला शिका. आम्ही चाकू सुरीवाले आहोत. ही शिवसेना चाकू-सूरी यांच्यातून वाढली आहे. त्यामुळे आम्हाला कट्ट्यारीची भाषा शिकवू नका. जर आमची कट्ट्यार घुसली ना, तर माहीत पडणार नाही," असा पलटवार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
कचरा महाराष्ट्राच्या सीमेबाहेर गुजरातमध्ये टाकणार : "सध्या देवेंद्र फडणवीस जे काय बोलतात हे त्यांचं नैराश्य आहे. निराश झालेला माणूसच अशाप्रकारे वक्तव्य करू शकतो. ते वैफल्यग्रस्त आहेत. त्यांनी सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटत आहे. ज्यांच्या डंपरमध्ये ते सध्या बसले आहेत. तो कचऱ्याचा डंपर आहे आणि त्या डंपरमध्ये बसून महाराष्ट्रमध्ये भाजपाचा प्रवास सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता या डंपरमधील सर्व कचरा महाराष्ट्राच्या सीमेबाहेर गुजरातमध्ये नेऊन टाकणार," असा हल्लाबोल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर केला.
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून लढण्याची ऑफर : "माझ्या माहितीनुसार भाजपा आणि त्यांचे जे दोन कचऱ्याचे डंपर आहेत, त्यांच्या हातून महाराष्ट्र निसटत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढवावी, असं मोदींना भाजपावाले विनंती करत आहेत. कारण मोदींच्यामुळे काही जागा महाराष्ट्रात निवडून येतील, म्हणून भाजपातील काही लोकं अशी ऑफर देत आहेत. पंतप्रधान मोदींनी नितीन गडकरी यांच्या जागी नागपूरमधून किंवा पुण्यातून निवडणूक लढवावी, अशी विनंती काहीजण करत आहेत. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस हे तिघं मिळून लोकसभा निवडणुकीत 40 च्यावर जागा जिंकणार आहेत, ही त्यांना भीती वाटत आहे. म्हणून मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढवावी, अशी ऑफर त्यांना दिली जात आहे," असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :