पुणे Sanjay Raut On Congress MLA : काल विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या तीनपैकी दोन उमेदवारांचा विजय झाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले. काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली असल्याचं सांगितलं जात आहे. आता यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कालच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली असून याच काँग्रेसच्या 7 गद्दारांनी मागच्यावेळी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला आहे. तसंच काल मोठ्या प्रमाणात आमदारांना पैसे तसंच दोन एकर जमीन देण्यात आली आहे. एकेका आमदाराला 20 ते 25 कोटी रुपये देण्यात आले असल्याचं यावेळी राऊत म्हणाले.
गद्दारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक : पुण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्याबाबत ते म्हणाले की, महायुतीचे लोक अशा पद्धतीने विजयोत्सव साजरा करत आहेत जणू त्यांनी महाराष्ट्र जिंकला आहे. कालच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर भाजपाचे १०३ आमदार आणि त्यांना काही आमदारांचा पाठिंबा असल्यानं त्यांचे लोकही जिंकून आले आहेत. तसंच जे दोन गद्दार गट आहेत त्यांनी त्यांच्या आमदारांना जिंकून आणलं आहे. गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठीची कालची ही निवडणूक होती. महाविकास आघाडीला कुठलाही फटका बसलेला नाही. काँग्रेसने काँग्रेसचा उमेदवार हा जिंकून आणला आहे तर शिवसेनेकडे कोटा नसताना देखील आम्ही काँग्रेसच्या मदतीने आमचा उमेदवार हा जिंकून आणला आहे, असं यावेळी राऊत म्हणाले.
फुटीर आमदारांना ही ऑफर : ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची ७ मतं फुटली आहेत आणि ते लपून राहिलेलं नाही. याचं आश्चर्य देखील नाही; कारण हे ७ लोक आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच ७ लोक होते. आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे असं काही नाही. काँग्रेसची जी ७ मतं फुटली आहेत ते लोक गेल्या २ वर्षांपासून काँग्रेससोबत नाहीत. याच ७ लोकांना घेऊन यांनी कालचा खेळ केला आहे. तसंच काल आमदारांचा भाव हा शेअर बाजाराप्रमाणे वाढत होता. एका एका आमदाराला २० ते २५ कोटी रुपये देण्यात आले. तसंच २ एकर जमीन देखील देण्यात आली आहे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
जयंत पाटलांच्या पराभवामागे 'हे' कारण : शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवाने महाविकास आघाडीतील छोटे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. यावर राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, कोणीही नाराज नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तसंच कालच्या निवडणुकीत छोटे पक्ष तसेच जे अपक्ष आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षाच्या बरोबर गेले असल्याचं पाहायला मिळालं आहे. जयंत पाटील यांच्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आहेत. त्यांना शरद पवार यांच्या पक्षातील सर्व मतंही मिळाली आहेत. थोडंसं गणित चुकल्यानं त्यांचा पराभव झाला असल्याचं यावेळी राऊत म्हणाले.
प्रत्येकच दिवस संविधान हत्या दिवस : केंद्र सरकारकडून येत्या २५ जुलै रोजी संविधान हत्या दिवस साजरा केला जाणार आहे. याबाबत राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांतील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे. त्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करत आहेत ते पाहावं लागणार आहे. आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणालं तर आणीबाणीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील समर्थन केलं होतं. आता हेच लोक बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागत आहेत. आता मग यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं काय मत आहे ते त्यांनी सांगावं, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा: