छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Crime News : संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरात काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालंय. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी पोलीस शिपाई असून त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्यानं अंधाराचा फायदा घेत डोक्यात गोळी मारुन या उद्योजकाची हत्या केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिलीय. रामेश्वर काळे असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तो ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होता, मात्र लाच घेण्याच्या आरोपात तो निलंबित होता.
गोळी झाडून लघुउद्योजकाची हत्या : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर भागातील क्रांतीनगर इथं सचिन साहेबराव नरोडे या लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना 17 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली होती. लघुउद्योजक असलेल्या या युवकाची अचानक हत्या झाल्यानं परिसरात खळबळ माजली होती. तसंच यामुळं उद्योग जगतात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांनी या घटनेचा उलगडा करत मोठं यश मिळवलंय.
पोलीसच निघाला आरोपी : या उद्योजकाच्या हत्येचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलंय. धक्कादायक म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार रामेश्वर काळे यानंच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून उद्योजक सचिन नरोडे यांची हत्या केली. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेला हवालदार रामेश्वर काळे याच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मागील अनेक दिवसांपासून आरोपी पोलीस व्यापारी नरोडे यांच्या मागावर होता. रविवार 17 मार्चला रात्री साजापूर परिसरातील वीज गेली असताना, अंधाराचा फायदा घेत आरोपीनं कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवलं. विशेष म्हणजे हा हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित होता, तसंच त्याच्यावर 354 प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे. पोलिसांमधीलच हा गुंडा पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या संभाजीनगरमध्ये सुरु आहे.
हेही वाचा :