मुंबई Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी चौकशीत अभिनेता सलमान खानच्या पनवेल परिसरात असलेल्या फार्म हाऊसचीही रेकी केल्याचं तपासात समोर आलंय. तसंच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बिहारमध्ये जाऊन दोन्ही आरोपींच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत.
सात जणांना चौकशीसाठी बोलावलं : गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आरोपींचा उद्देश केवळ दहशत निर्माण करणे होता आणि हत्येचा कोणताही प्लॅन नव्हता. मुंबई गुन्हे शाखेनं बिहारमध्ये जाऊन दोन्ही आरोपींच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत." मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान गोळीबार प्रकरणात हरियाणा आणि इतर राज्यातून जवळपास 7 जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून या सर्वांची मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशी करत आहेत.
बिहारमध्ये रचला होता कट : दहशत निर्माण करण्यासाठी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करण्याचा कट काही महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दोन्ही आरोपींच्या चौकशीतून उघडकीस आलीय. त्यासाठी दोघांनाही योग्य वेळेस पैसे आणि घातक शस्त्रे पुरविण्यात आले होते. पैसे आणि शस्त्रे पुरविणार्या व्यक्तींची नावं समोर आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी आता गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतलीय. दरम्यान याच कटाचा भाग म्हणून सोनू गुप्ता नावाच्या एका संशशिताला हरियाणा येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.
आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे : सोनू गुप्ता याला मुंबईत आणलं जाणार आहे. सोनू हा या कटातील आरोपी विक्की गुप्ता याचा भाऊ असल्याचे बोललं जातंय. गोळीबारानंतर सोनू हाच या दोन्ही आरोपींच्या संपर्कात होता अशी माहिती तपासात उघडकीस आलीय. दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यासाठी गुन्हे शाखेची पथकं गुजरात, दिल्ली, बिहार आणि हरियाणा इथं पाठविण्यात आली आहेत.
हेही वाचा :