शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं सालाबादप्रमाणं यंदाही 3 दिवस साईबाबांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार. शुक्रवार (11 ऑक्टोबर) ते रविवार (13 ऑक्टोबर) या कालावधीत साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन : साईबाबा संस्थानच्या वतीनं यंदा साईबाबांची 106 वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार असून उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीनं आकर्षक विद्युत रोषणाई व श्री साई तिरुपती हा भव्य देखावा गेट क्र. 4 च्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलाय. तसंच उत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
70 हजार चौरस फुटाचा भव्य मंडप : साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त देश-विदेशातील लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. समाधीच्या दर्शनासाठी साईभक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसर, चावडी, मारुती मंदिरासमोरील 50 ठिकाणी शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिणेकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर आणि नवीन श्री साई प्रसादालय परिसर आदी ठिकाणी 50 हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आलाय. तसंच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी भक्त निवासस्थान येथं 20 हजार चौरस फुटाचा असा एकुण 70 हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
11 ठिकाणी लाडू विक्री केंद्र : साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयामध्ये उत्सवाच्या पहिल्या दिवशी मुगडाळ शिरा, मुख्य दिवशी बालुशाही व तिसऱ्या दिवशी लापशी भाविकांना प्रसादात देण्यात येणार. तसंच भाविकांसाठी सुमारे 110 क्विंटल साखरेचा मोतीचूर लाडू प्रसाद व मोफत बुंदी प्रसादाची पाकिटं तयार करण्यात आली आहेत. उत्सव काळात भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेनं उपलब्ध व्हावं यासाठी वेगवगळया 11 ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत.
हेही वाचा