मुंबई RTI Activist Murder In Mumbai : स्पामध्ये पोलीस आरटीआय कार्यकर्त्याची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना वरळी इथल्या सॉफ्ट टच स्पामध्ये बुधवारी रात्री घडली. गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे असं हत्या करण्यात आलेल्या खबऱ्याचं नाव आहे. सॉफ्ट टच स्पामध्ये हत्या प्रकरणी पोलिसांनी स्पा मालक संतोष शेरेकर याला अटक केल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली आहे. वरळी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी ही या प्रकरणी 26 वर्षीय आरोपीला ठाण्यातून अटक केल्याची माहिती दिली आहे.
स्पा मालकानंच रचला कट, मारेकऱ्याला नालासोपाऱ्यातून अटक : वरळी येथील सॉफ्ट टच स्पामध्ये झालेल्या हत्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा इथून 26 वर्षीय मोहम्मद फिरोज अन्सारी या आरोपीला अटक केली. साकिब अन्सारी आणि इतर दोन आरोपींना कोटा इथून गुन्हे शाखेनं अटक केल्याची अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे. स्पाचा मालक शेरेकर यानं हा हत्येचा कट रचला असल्यानं त्याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
मैत्रिणीसोबत वाढदिवसाची पार्टी केली साजरी : विले पार्ले पूर्व इथल्या आंबेडकर नगर परिसरात राहणारा गुरुसिद्धप्पा वाघमारे (वय 50) या आरटीआय कार्यकर्त्याचा 17 जुलैला 50 वा वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी मैत्रिणीनं गुरुसिद्धप्पा वाघमारेकडं मागितली. त्यावर त्यानं सायन इथल्या अपर्णा बारमध्ये मैत्रिणीसोबत वाढदिवसाची पार्टी साजरी केली. त्यानंतर गुरुसिद्धप्पा वाघमारे मैत्रिणीसह अन्य तीन जणांसोबत वरळी इथल्या सॉफ्ट टच स्पामध्ये रात्री 12.30 वाजताच्या सुमारास गेला. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हा स्पा बंद होता. मात्र, या स्पामध्ये एक केअर टेकर मालकानं ठेवला. तो रात्री या स्पामध्ये राहत असे. तसेच या स्पामध्ये गुरुसिद्धप्पा वाघमारेची मैत्रीण अगोदर काम करत होती.
सॉफ्ट टच स्पामध्ये राहत होती मैत्रीण : वरळी इथल्या सॉफ्ट टच स्पामध्ये काम करण्यापूर्वी गुरुसिद्धप्पा वाघमारेची मैत्रीण मुलुंड इथल्या एका स्पामध्ये काम करायची. त्यावेळी तिथं त्याची त्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीचं रिलेशनशिपमध्ये रूपांतर झालं. गुरुसिद्धप्पा वाघमारे हा वरळीतील या स्पामध्ये अधूनमधून मैत्रिणीला भेटायला येत असे. गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या मैत्रिणीला पतीनं सोडचिठ्ठी दिली असून ती स्पामध्ये काम करुन उदरनिर्वाह करते.
स्पामध्ये धारदार शस्त्रानं केली हत्या : वाढदिवसाची पार्टी साजरी करून मैत्रिणी आणि तीन स्पामधील कामगारांसह गुरुसिद्धप्पा वाघमारे हा वरळीतील स्पामध्ये बुधवारी रात्री 12.30 वाजता आला. त्यानंतर तीन कामगार शटर उघडून बाहेर आल्यानंतर दोन अज्ञात मारेकऱ्यांनी स्पामध्ये प्रवेश केला. यावेळी गुरुसिद्धप्पा वाघमारेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून दोघंजण फरार झाले. याबाबत महिलेनं स्पा मालकाला खुनाची माहिती कळवली. मालकान रात्री 1.45 वाजताच्या सुमारास वरळी पोलीस ठाण्याला माहिती दिली. स्पामधील 3 कामगार आणि गुरुसिद्धप्पा वाघमारेची मैत्रीण यांच्याकडं पोलिसांनी चौकशी करत पुढील तपास सुरू केला आहे.
गुरुसिद्धप्पा वाघमारेवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित : गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे याच्यावर तडीपारीची कारवाई विले पार्ले पोलिसांकडून होणार होती. वाघमारेविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात 5 तर मुलुंड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तसेच विले पार्ले पोलीस ठाण्यात इतर 5 अदखलपात्र गुन्हे देखील दाखल आहेत. यापैकी बहुतांश गुन्हे हे खंडणीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Mumbai Murder News: दागिने शोरुम मालकाच्या पत्नीची घरातील नोकराकडून हत्या, बिहारला पळून जाताना रेल्वे स्थानकातून अटक
- मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या; चिकन तंदुरीच्या पैशावरून झाला वाद - Mumbai Crime News
- 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; कुर्ल्यात आढळलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले, आरोपीला ३६ तासात अटक