बारामती (पुणे) Rohit Pawar : आमदार रोहित पवार आज (13 एप्रिल) बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यात सात ठिकाणी त्यांचे आज संवाद दौरे आहेत. कन्हेरी येथे नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जो पक्ष आहे, अजित पवार मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी त्यांना साथ देणारे ठराविक काही भाजपाचे लोक हे दोघे मिळून सामान्य कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धमकवलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
भावंड प्रचारात उतरले नाहीत : माझ्या आजवरच्या निवडणुकीत माझे भाऊ कधीही प्रचारात उतरले नाहीत. आता ते माझ्या विरोधात प्रचारात उतरले आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याबाबत रोहित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, अजित पवार त्यांच्या भावांची बदनामी करत आहेत. मी छोटा कार्यकर्ता म्हणून अजित पवारांना विनंती करतो की, तुमच्यात खऱ्या अर्थानं धाडस असेल तर भावांचे नाव घ्या, काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा. हे सर्व लोकांसमोर येऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. मोघम वक्तव्य करून भावंडांची बदनामी का करता? अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
सुप्रिया सुळेंना अधिकचे लीड मिळेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुसंख्य लोक अजित पवारांसोबत गेले आहेत, असं असतानाही खासदार सुप्रिया सुळे तीन लाखांच्या फरकाने निवडून येण्याचे गणित कसे असेल? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना अधिकचे लीड मिळेल. कारण अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे आहेत. तेसुद्धा भाजपावर नाराज आहेत. तसेच कुटुंब आणि पक्ष फोडला. याबाबत लोक नाराज आहेत. त्यामुळे भाजपाचे मतदारही यंदा सुप्रिया सुळेंच्या बाजूने मतदान करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा: