मुंबई Rohit Pawar : कथित बारामती अॅग्रो घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी केली. आता त्यांना पुन्हा 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं : रोहित पवार बुधवारी, 24 जानेवारीला रात्री उशिरा ईडी कार्यालयातून बाहेर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचं उत्साहात स्वागत केलं. कार्यकर्त्यांनी रोहित पवारांना खांद्यावर उचलून घेतलं आणि फटाके देखील फोडले. यावेळी रोहित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, "दिल्ली समोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही. मी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. शरद पवारांनी अनेक युवा कार्यकर्ते उभे केले. आपला एखादा कार्यकर्ता अडचणीत आला, ते लढणाऱ्याच्या मागे राहतात, पळणाऱ्याच्या मागे नाही".
सुप्रिया सुळे पूर्ण वेळ उपस्थित : रोहित पवार बुधवारी दुपारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या. ईडीकडून रोहित पवारांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. या पूर्ण चौकशी दरम्यान सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात होत्या. तर रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत, असं सांगण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. रोहित पवारांकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. त्यांना गेल्या वर्षी या संदर्भात ईडीकडून नोटीस मिळाली होती. मात्र, मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतो, त्यामुळे सरकारकडून माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
दरम्यान संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ही ईडीचे समन्स मिळाल्याची माहिती आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स दिल्याची माहिती आहे. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा विरोधकांच्या मागे असाच सुरू राहणार असंच यावरुन दिसत आहे.
हे वाचलंत का :