नांदेड Cruiser Crash In Godavari River : भरधाव वेगानं जाणाऱ्या क्रुझर जीपचे टायर फुटल्यानं जीप येळी महाटी पुलावरुन गोदावरी नदीत कोसळली. या भीषण अपघातात जीपमधील दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात शुक्रवार 10 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडला. क्रूझर जीप शिखाचीवाडी (ता. मुदखेड) येथील असून जीपचालक आणि येळी (ता. लोहा) येथील युवक चिलपिंपरी येथे नागरिकांना सोडून शुक्रवारी सायंकाळी येळीकडं निघाले होते. यावेळी जीपचे टायर फुटले आणि जीप पुलावरुन गोदावरी नदीत कोसळली. मृतांमध्ये उद्धव खानसोळे आणि बबलू ढगे या दोघांचा समावेश आहे.
जीप गोदावरी नदीत कोसळल्याने दोन जणांना जलसमाधी : उद्धव आनंदराव खानसोळे यानं क्रुझर गाडीनं भाडे सोडून लोहा तालुक्यातील येळी येथील त्याचा मित्र बबलू मारोती ढगे याला भेटण्यासाठी क्रुझर ( एम एच 26 बी क्यू 2061 ) जीप घेऊन येळी येथे दुपारी आला होता. दुपारी चार वाजता आल्यानंतर त्यानं आपल्या मित्रांसोबत जेवण करुन ते दोघं येळी येथून मुदखेडच्या दिशेनं जात होते. यावेळी येळी गावच्या बाजूनं असलेल्या गोदावरी नदी पात्राच्या 30 ते 35 फूट खोल पाण्यात गाडीसह दोघं जण गोदावरी नदीतील पाण्यात बुडाले. घटनास्थळी असलेल्या गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं शेकडो नागरिक जमा झाले. त्यापैकी गावातील काही नागरिकांनी नांदेड येथील अग्निशमन दलाला फोन करुन बोलावून घेतलं.
दोन्ही मित्रांचा गोदावरीत करुण अंत : सदर घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, बीट जमादार निळकंठ श्रीमंगले, पवार हे धावून गेले. गावकरी यांनी बोटीच्या मदतीनं दोन्ही मृतदेह गोदावरी पात्रातून बाहेर काढले. घटनास्थळ हे मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यानं मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत बबलू मारोती ढगे आणि उद्धव आनंदराव खानसोळे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. घटनास्थळाला मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सप्रे यांनी भेट दिली. दोन्ही मित्रांचा गोदावरीत करुण अंत झाल्यानं नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
अग्निशमन दल धावले मदतीला : गोदावरी नदीवरील येळी महाटी पुलावरुन क्रुझर जीप खोल पाण्यात पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी धावाधाव करण्यात आली. यावेळी नांदेड येथील अग्निशमन दलाचे अधिकारी दासरे आणि निलेश कांबळे यांच्यासह सर्व कर्मचारी धाऊन आले. यावेळी मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रुझर जीप पाण्यातून काढली असून तिला नदी किनाऱ्यावर आणण्यात आलं आहे. घटनास्थळी गोदावरी नदीच्या पात्रात शेकडो नागरिक जमा झाले.
हेही वाचा :