मुंबई Online Money Fraud : सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420, 419 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय बाळकृष्ण मधये हे करत असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी दिली आहे.
अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन आला मॅसेज : सेवानिवृत्त नौदल अधिकारी मनाशकुमार हरी रंजन रॉय (वय 70) हे अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनाशकुमार रॉय यांचे ॲक्सिस बँकेमध्ये बचत खाते असून ते ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी वापरले जाते. 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 36 मिनिटांनी मनाश कुमार रॉय घरी असताना त्यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून एक मॅसेज आला.
बॅंक खात्यातून डेबिट झाले 98 हजार : रॉय यांचे बँक खाते ॲक्सिस बँकेत असल्यामुळे त्यांना या मॅसेजवर संशय आला नाही. त्यांना हा मेसेज खरा वाटला. म्हणून रॉय यांनी उत्सुकतेने मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून बँक खात्याची संपूर्ण माहिती भरली. त्याच वेळी रॉय यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक प्राप्त झाला आणि ओटीपी क्रमांक त्या लिंकवरील ऑप्शनमध्ये भरला असता थोड्याच वेळाने रॉय यांच्या बचत खात्यातून 98 हजार 596 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला.
बॅंकेकडून करण्यात आले 'हे' आवाहन : त्याचवेळी रॉय यांना समजले की, त्यांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे आणि ते सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यानंतर रॉय यांनी ओशीवरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल नंबरवर मॅसेजद्वारे लिंक पाठवून रिवॉर्डचे आमिष दाखवून सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याला गंडा घालण्यात आला आहे. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून वारंवार कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका अथवा आपला ओटीपी आणि आर्थिक व्यवहारासंदर्भातील बँकेकडून दिलेले सिक्रेट नंबर कोणाशीही शेअर करू नका, असे नागरिकांना आवाहन करण्यात येते, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- राज्यातील राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घसरली; रोहित पवारांची टीका - Rohit Pawar PC
- एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse
- 'आम्ही ग्राऊंडवर काम करणारे कार्यकर्ते, ठाकरे यांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही काम आहे का?'; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024