नागपूर Mohan Bhagwat Flag Hoisting : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संघ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं.
संविधानाचं पालन करणं महत्त्वाचं : यावेळी बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, "आजचा दिवस देशभर साजरा होत आहे. जसं वातावरण 22 जानेवारीला निर्माण झालं, तसंच आजही बघायला मिळतंय. पण हे एक दिवसासाठीच नको. संविधानाला सुरक्षित ठेवणं आणि लागू करणं हे सरकारचं काम आहे. असे असले तरी आपलंही कर्तव्य आहे. संविधानाची प्रस्तावना महत्त्वाची आहे. हा आपल्या देशाचा सामुहिक संकल्प आहे. याचं आचरण करायला हवं. तसंच सर्वांना एकत्र आणण्यासाठी स्वतंत्र, समता आणि बंधुता गरजेची असल्याचंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं कौतुक : "नियम कायम रहावे यासाठी सरकारच्या हातात कायदा आहे. पण व्यवस्थेचं पालन करणं महत्त्वाचं आहे. ही आपण आपल्यासाठी बनवलेली व्यवस्था असून भारतातील लोकांची ताकद मोठी आहे. जेव्हा लोक जागे होतात तेव्हा त्याची ताकद अख्ख जग बघतोय. हे सघ्या होतं आहे. तसंच आपली सर्व क्षेत्रात ताकद वाढली असून 40 वर्षांपूर्वी हे कुणी म्हटलं असतं तर तसं होत नव्हतं, पण आता होतंय", असं म्हणत मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.
देश विश्वगुरु होण्याचं स्वप्न पाहतोय : पुढं ते म्हणाले की, "स्वार्थ बाजूला ठेऊन, देश हितासाठी सर्व भेद सोडून ते जीवन अर्पण करत आहेत. त्यामुळं आपण विश्वगुरु होण्याचं स्वप्न पाहतोय. ते काही वर्षांत शक्य होणार आहे. हे लक्षात ठेऊन आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय." दरम्यान, रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरातील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या वतीनं प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
हेही वाचा -