नागपूर Bird Flue In Nagpur : शहरात बर्ड फ्लूचा धोका वाढल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. नागपूर शहरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या केंद्रातील मृत कोंबड्यांचे नमुने अगोदर पुणे आणि त्यानंतर भोपाळ इथल्या NIHSAD इथं पाठवणयात आले होते. या दोन्ही ठिकाणचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची ( एव्हियन इन्फ्ल्युएन्झा ) लागण झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र : प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळं या केंद्राच्या दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू करण्यात आले आहेत. संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर परिसरातील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही, असं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.
पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरु : जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार आणि केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्हात शिघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. 4 मार्च रोजी रात्री 9 वाजतापासून अंडी उबवणी केंद्र नागपूर येथील उर्वरित पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. पाच मार्च रोजी अखेरपर्यंत येथील एकूण 8 हजार 501 पक्षी आणि 16 हजार 774 अंडी तसेच 5 हजार 400 किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आलं आहे.
घाबरु नका जागरुक राहा : प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर संस्थेच्या संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण पूर्ण करण्यात आलं. बर्ड फ्लू रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगानं जिल्हातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांना अवगत करण्यात आलं. जिल्ह्यात कुठंही प्रभाव आढळून आलेला नाही. शेतकरी आणि पशुपालक यांनी घाबरुन न जाता जागरुक राहणं गरजेचं आहे, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नागपूर यांनी केलं आहे.
हेही वाचा :