मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सी समरी रिपोर्ट गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाला सादर केला. हा अहवाल आता न्यायालयानं स्वीकारला आहे. त्यामुळे खासदार रवींद्र वायकर यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा आता थांबला आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट दिली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याबाबतचा सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला. या अहवालात मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गैरसमजुतीतून रविंद्र वायकर यांच्या विरोधात तक्रार दिल्याचं म्हटलं आहे. हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्यानं आता रवींद्र वायकर यांच्यावरील गुन्हे मागे घेत असल्याचं मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.
किरीट सोमय्यांनी केला जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचा आरोप : लोकसभा निवडणुकीच्या आधी साधारण डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथे भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला. तेव्हा रवींद्र वायकर हे शिवसेना ठाकरे गटांमध्ये होते. यात किरीट सोमय्या यांनी म्हटले होते की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीच्या भूखंडावर रवींद्र वायकर यांनी एक फाइव स्टार हॉटेल बांधण्याचा प्रयत्न केला. यातून जवळपास 500 कोटींचा घोटाळा वायकर यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. रवींद्र वायकर यांच्या या प्रकारामुळे पालिकेचा महसूल बुडाल्याचे देखील किरीट सोमय्या यांनी म्हटले. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंता संतोष मांडवकर यांनी आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार दिली.
आर्थिक गुन्हे शाखेनं दिली रवींद्र वायकरांना क्लीन चीट : कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या सोबतच खासदार वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, आर्किटेक्ट अरुण दुबे, आसू नेहलानी, प्रीथपाल बिंद्रा, राज लालचंदानी यांना देखील सह आरोपी करण्यात आले. मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात रवींद्र वायकर यांना क्लीन चीट दिल्यानं या सर्वांवरील गुन्हे मागे घेत असल्याचं मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे. आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अहवाल न्यायालयानं मान्य केल्यानं, या सर्वांवरील चौकशीची टांगती तलवार आता टळली आहे.
हेही वाचा :
- "दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायची बाकी", रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut
- काय तर म्हणे विद्यमान खासदाराविरुद्ध महापालिकेनं केली गैरसमजातून तक्रार! इओडब्ल्यूकडून कोणाकोणाला मिळाली क्लीन चिट - Ravindra Waikar
- खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट; जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यातून वायकर मुक्त - Ravindra Waikar Clean Chit