कोल्हापूर : सामाजिक क्रांतीचे अग्रणी आणि कोल्हापूरच्या उद्योगनगरीचे शिल्पकार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या शिवाजी उदयनगरीची टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनाही भुरळ पडली होती. 2013 मध्ये सांगलीतील इस्लामपूरात भेटलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळांकडून त्यांनी याबाबत माहितीही जाणून घेतली होती. कोल्हापूरला भेट देण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, ही भेट अधुरी राहिली. वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांच्या निधनानं भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर कोल्हापुरातील उद्योजकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय.
उद्योग क्षेत्राला चालना : 100 वर्षांपूर्वी काळाच्या पुढं जाऊन विचार करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात उद्योग क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी उद्यमनगर उभं केलं. पुढच्या काळात राजाराम महाराजांनी देखील कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम केलं होतं. भारताच्या उद्योग क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगाला भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात माहिती घेतली होती.
कोल्हापूर भेट अधुरी : 10 नोव्हेंबर 2013 रोजी आर.आय.टी.कॉलेज सांगलीमध्ये पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रतन टाटा उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरातील अनेक नामवंत उद्योजकांच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली होती. कोल्हापूरच्या उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या 'कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'च्या शिष्टमंडळानं कोल्हापूरच्या अनेक समस्या रतन टाटा यांच्यासमोर मांडल्या होत्या. या समस्या सोडविण्यासाठी आपण तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही टाटा यांनी या शिष्टमंडळाला दिली होती. याबरोबरच कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राला भेट देण्यासाठी आपण येणार, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांची कोल्हापूर भेट अधुरी राहिल्याची खंत कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.
एक इच्छा पूर्ण झाली असल्याचं समाधान : कोल्हापूर जिल्ह्यात हवाई कार्बोहब निर्माण व्हावं, अशी इच्छा उद्योगपती रतन टाटा यांची होती. यासंदर्भात कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रातील जाणकारांशी त्यांनी चर्चा केली होती. आता कोल्हापूर विमानतळ सर्व सुविधानियुक्त झालं. रतन टाटा यांची एक इच्छा पूर्ण झाली असल्याचं समाधान आहे. मात्र, उद्योग भूषण रतन टाटा यांच्या निधनानं कोल्हापूर भेट होऊ शकली नाही, ही खंत मनात कायम राहील, अशा भावना आनंद माने यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा