मुंबई : देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना 'ब्रिच कँडी' रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आलंय.
'आयसीयू'त उपचार सुरू : दोनच दिवसांपूर्वी टाटा यांनी 'एक्स'वर पोस्ट करून आपण तंदुरुस्त असल्याचं सांगितलं होतं. मात्र, टाटा यांची प्रकृती आता चिंताजनक असून, त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. याबाबत रुग्णालय प्रशासन किंवा टाटा ग्रुपकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
सोशल मीडियावर अफवा : रतन टाटा यांची तब्येत सोमवारी रात्रीपासून खालावली असल्याचा दावा काही रिपोर्टमधून करण्यात आला होता. मात्र, तब्येत उत्तम असल्याची माहिती रतन टाटा यांच्या 'एक्स' या सोशल मीडियाच्या हँडलवरून देण्यात आली होती. मात्र, बुधवारी (9 ऑक्टोबर) पुन्हा त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती मिळत आहे.
नियमित तपासणीसाठी रूग्णालयात दाखल : "माझ्या आरोग्याबाबत अफवांची मला जाणीव आहे. पण ते सर्व दावे निराधार आहेत, याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळं तपासणी करत आहे. त्यामुळं चिंतेचं कारण नाही. माझी तब्येत सध्या ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये", असं आवाहन रतन टाटा यांनी 7 ऑक्टोबरला 'एक्स'वरील पोस्टद्वारे केलं होतं.
रतन टाटा यांच्याबद्दल थोडक्यात : एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच रतन टाटा हे त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी झाला. जेव्हा रतन टाटा फक्त १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे पालक वेगळे झाले, त्यानंतर त्यांचं संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केलं. आधुनिक भारताच्या जडणघडणीत टाटा यांचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. रतन टाटांनी 1962 मध्ये 'टाटा ग्रुप'मधून करिअर सुरू केलं. तेव्हा त्यांचं वय फक्त 24 वर्ष होतं. जेआरडी टाटांनंतर रतन टाटा हे 1991 मध्ये टाटा समूहाचे पाचवे अध्यक्ष झाले.
हेही वाचा -