नागपूर Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. विविध नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु असून या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाविषयी देखील खलबतं सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास बळावलाय. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष राज्यभर मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळं मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर यावरच आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाष्य केलंय.
रमेश चेन्नीथला काय म्हणाले? : रमेश चेन्नीथला यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? यासंदर्भात रमेश चेन्नीथला यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मुख्यमंत्रीपद हे महाविकास आघाडीकडेच असेल. आम्ही सर्व महाविकास अघाडी म्हणून निवडणूक लढवू. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल. आम्ही कोणालाही मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट करणार नाही. आमच्यात कुठलाही मतभेद नसून सर्वांना सोबत घेऊनच आघाडी धर्म पाळू." तसंच महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दुःख व्यक्त करून चालणार नाही, कारवाई करा : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, "केवळ माफी मागून आणि दु:ख व्यक्त करून चालणार नाही. तर या घटनेतील दोषींवर कारवाईही झाली पाहिजे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमागे कोण आहे ते
बघितलं पाहिजे."
विधानसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल : यावेळी बाळासाहेब थोरात यांनीही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागावाटप योग्य प्रकारे व्हाव्या यासाठी महाविकास आघाडीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीला नक्कीच मोठं यश मिळेल", असा दावाही त्यांनी यावेळी केला. तर यावेळी मालवण घटनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, "अनुभव नसलेल्या व्यक्तीनं महाराजांचा पुतळा तयार केला. पुतळ्याच्या डोक्यात कापूस आणि कागद टाकल्याचं निदर्शनास आलंय. महाराजांचा अपमान करण्याचा धाडस आमच्यात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. यासर्व घटनेत राज्य सरकारही जबाबदार आहे", असा आरोप पटोले यांनी केलाय.
हेही वाचा -
- विधानसभा निवडणूक 2024 : आरक्षणावरुन गाजणार आगामी निवडणूक ?: मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे संभ्रम - Assembly Election 2024
- विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच विरोध; 'या' नेत्यानं दिलं आव्हान - Kothrud Assembly Election 2024
- जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत मिठाचा खडा; शेकापचे दोन उमेदवार घोषित झाल्यानं आघाडीत बिघाडी? - Jayant Patil