मुंबई Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेत रिक्त होणाऱ्या एकूण 56 जागांवर 28 तारखेला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. सध्याच्या संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपाचे 3 खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. तसंच शिंदे गट, अजित पवार गटाचे प्रत्येकी 1 खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेसचाही 1 खासदार निवडून येऊ शकतो. मात्र, या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटासह शरद पवार गटाला मोठा धक्का सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडणून येण्याची शक्यता दिसत नाहीय. अशा परिस्थितीत भाजपानं पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करत महायुतीकडून चौथा उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चौथ्या उमेदवाराचे मतं फोडण्याचा प्रयत्न : राज्यसभेच्या 6 जागांसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार आहे. या सहापैकी 5 जागांवर महायुतीचा करिष्मा दिसून येण्याची शक्यता आहे. तसंच एक जागा काँग्रेसला भेटण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. मात्र, सत्तांतरानंतरच्या नाट्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. अशा स्थितीत महाआघाडीकडून चौथा उमेदवार देऊन ही निवडणूक चुरशीची करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विशेषत: भाजपाकडून महाविकास आघाडीची मते फोडण्याचा मोठा प्रयत्न या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
अंतिम निर्णय लवकरच : विधानसभेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता भाजपाकडं सर्वाधिक 104 आमदार आहेत. तर 13 अपक्षांचा आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे. त्यानंतर काँग्रेसचे 45 आमदार असून त्यांचा 1 खासदार सहज निवडून येऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 40 आमदारांचा पाठिंबा असून त्यांना इतर अपक्ष आमदारांचादेखील पाठिंबा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं 43 आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडं, उद्धव ठाकरे यांच्याकडं 14, शरद पवार गटाकडं 10 आमदार असल्यानं त्यांनी युती करून संयुक्त उमेदवार दिला तरी त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही. त्याचा फायदा घेत महायुतीकडून चौथा उमेदवार देऊन ही निवडणूक रंगतदार करण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गुरुवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर आज मुंबईत बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण राज्यसभा निवडणुकीबाबत जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निवडणुकीत चौथा उमेदवार द्यायचा की नाही? याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतीची 17 मतं फोडली : मागील इतिहास पाहता, मे 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपानं तिसरा उमेदवार उभा केला होता. कारण भाजपाला 12 मतांची गरज असताना देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत भाजपाचे अनिल बोंडे, पियुष गोयल धनंजय महाडिक यांनी धक्कादायक विजय मिळवला होता. त्यावेळी महाविकास आघाडीतीची 17 मतं फुटली होती. अनिल बोंडे, पियुष गोयल यांना प्रत्येकी 48 तर धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली होती. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या निकालानं राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणं ढवळून निघालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकीना उमेदवारी : अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, शिंदे गटाचे खानापूर, सांगलीचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळं दोन जागा रिक्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील 286 आमदार या निवडणुकीत मतदान करण्याची शक्यता आहे. विजयासाठी मतदानाचा कोटा 41 मतांचा असेल. अशा स्थितीत काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची दाट शक्यता आहे. यातील दुसरी बाजू म्हणजे वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दीकी तसंच त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व कारणांमुळं राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.
हे वाचलंत का :