मुंबई Rajiv Shukla On Vote Jihad Remark : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रचार रॅलीत बोलताना वोट जिहाद बाबत मोठं विधान केल्यानं मोठा गदारोळ होत आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव शुक्ला यांनी या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. "काँग्रेस पक्षाच्या घोषणा पत्रात जिहाद शब्दाचा उल्लेखच नाही, मग वोट जिहाद कसा," असा सवाल करत खासदार राजीव शुक्ला यांनी भाजपावर हल्लाबोल केला. काँग्रेसनं राम मंदिराला कधीच विरोध केला नाही. परंतु श्रेय घेण्यात भाजपा मास्टर आहे, असा आरोपही खासदार राजीव शुक्ला यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार राजीव शुक्ला यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला खास मुलाखत दिली, यावेळी त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली.
भारतात वोट जिहाद चालेल की वोट राम राज्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील खरगोण इथल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी देशात वोट जिहाद चालेल की वोट राम राज्य, हे आपल्याला ठरवायचं आहे, असा हल्लाबोल केला. सदर विधानाचा समाचार घेत राजीव शुक्ला म्हणाले की, दहा वर्षात भाजपानं रामराज्य निर्माण केलं नाही. श्रीराम भगवान यांनी राक्षसांना आपल्या पार्टीत घेतलं होतं का, हे सगळे उलटे करत आहेत. पक्षाच्या जाहीरनाम्यात कुठंही जिहाद शब्दाचा उल्लेख नाही, तसंच हिंदू मुस्लिम कुठं उल्लेख करण्यात आला नाही. गेल्या दहा वर्षात कोणतीही विकास कामं त्यांनी केली नाहीत. त्यामुळे धार्मिक मुद्द्याला हात घालत मते मागण्याची भाजपाची सवय आहे, असा आरोप राजीव शुक्ला यांनी केला. राम मंदिर उभारणीला काँग्रेसनं कधी विरोध केला नाही. उलट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतच केलं. मंदिराच्या उभारणीसाठी सगळ्यांचा हातभार लागला आहे. त्यात काँग्रेस पक्षाचा देखील वाटा आहे. श्रेय घेण्याची मास्टर डिग्री भाजपानं मिळवली आहे, असा घनाघातही त्यांनी केला.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वोट बँक आहे : "महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं फोडलेले आमदार आहेत, पण वोट नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं फोडलेले आमदार आहेत, मात्र वोट नाही. ते शरद पवार यांच्याकडं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जास्तीस जास्त लोकसभा जागा राज्यात येतील," असा विश्वासही राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, अशा प्रकारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यांनी विधान केले. यावर राजीव शुक्ला म्हणाले की, "गेल्या दहा वर्षात मोदी सरकारकडून ओबीसी अंतर्गत मुस्लिम सामाजाला आरक्षण मिळत आहे." राज्यातील लोकसभा निवडणूक वैयक्तिक टीका केली जात आहे. यावर बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान जेव्हा टीका टिपणी करतात तर नागरिक देखील तशाच प्रकारे बोलतात. निवडणूक आयोग मात्र गप्प बसला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देखील कमजोर आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :