छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी देखील चित्ते पिंपळगाव इथं जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी मतदान केलं. सायंकाळी 6 वाजतापर्यंत सर्वांनी मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. त्यावेळी मतदान अधिकाऱ्यांची त्यांनी विचारपूस करून गावातील गावकऱ्यांना शंभर टक्के मतदान होईल, असं प्रयत्न करा, अशा सूचना वडीलधारी म्हणून दिल्या.
नियमांचं पालन करून मतदान : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या चित्ते पिंपळगाव इथं जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांनी सोबत असलेले पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसह लोकांना बाहेर थांबण्यास सांगितलं. केंद्रात गेल्यावर आधी मतदानासाठी आलेल्या दोन ते तीन मतदारांना आधी मतदान करून दिलं त्यांनतर ते आत गेले. मतदान अधिकारी यांना आपली पोलिंग चिट दाखवत नावाची पुष्टी केली. आपलं आधार कार्ड दाखवून आपलं ओळखपत्र सादर करून नियमांचं पालन केलं. मतदान केल्यावर तेथील अधिकाऱ्यांचे आभार मानून ते बाहेर पडले. बाहेर आल्यावर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांना बोलावून घेत मतदान केल्याचा फोटो काढला. यावेळी सर्वांनी मतदान करावं, मतदान आपला हक्क असल्यानं सायंकाळी सहापर्यंत जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तर आपण किती वेळा मतदान केलं हे मोजावं लागेल, असं गंमतीशीर उत्तर त्यांनी दिलं.
शिवसैनिकाचे हरिभाऊ बागडेंना गंमतीशीर उत्तर : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा चित्ते पिंपळगाव येथे जाताच गावातील वातावरण बदललं. मोठा पोलीस ताफा, अधिकारी यांच्या गराड्यात हरिभाऊ बागडे मतदान केंद्राकडं चालू लागले. त्यावेळी गावातील सर्वांची चौकशी करत ते पुढं जाऊ लागले. मतदान केंद्राच्या बाहेर पोलिंग एजेंट तैनात होता. त्याला चौकशी करत असताना "तू कोणाचा" असा प्रश्न त्यांनी विचारला. काही सेकंद कार्यकर्त्याला काय बोलावं सूचलं नाही, मात्र नंतर "नाना मी 'या' पक्षाचा" असं उत्तर दिल्यावर हरिभाऊ बागडे यांनी देखील स्मित हास्य देत मार्गक्रमण केलं. त्यावेळी मात्र खासदार संदीपान भुमरे यांनी त्या कार्यकर्त्यांकडं रागानं पाहिलं. त्यामुळे उपस्थितांना मात्र हसू आवरला नाही.
हेही वाचा :