पुणे Pune Student Ragging : पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिंनीवर रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या दोन घटना गेल्या महिनाभरात घडल्या. यातील एक विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी असून एक्सरे-रेडिओलॉजी विभागात पदव्युत्तर शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकतेय. दुसरी विद्यार्थिनी ॲनेस्थेसियोलॉजी विभागात पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेतेय.
रुग्णालयानं दिले चौकशीचे आदेश : बी जे मेडिकल कॉलेज तसंच ससून रुग्णालयामध्ये अशा घटना घडत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात दोन पदव्युत्तर विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याची घटना समोर आल्यानं पुण्यात खळबळ उडालीय. या संदर्भात विद्यार्थिनीनं ससून रुग्णालय प्रशासनाकडं तक्रार दिलीय. त्यामुळं ससून रुग्णालयानं देखील चौकशीचे आदेश दिले आहेत.
तक्रारीची चौकशी सुरू : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम वर्षाच्या दोन पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांनी वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा आरोप तक्रारीत केलाय. पहिल्या विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर रॅगिंग प्रतिबंधक समितीनं चौकशी करून आपला अहवाल सादर केला. यात समितीनं तक्रारदार विद्यार्थिनी, तिचे वर्गमित्र, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, प्राध्यापकांची चौकशी केली. त्यानंतर चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठवला. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अन्य एका विद्यार्थ्याच्या तक्रारीचीही सध्या चौकशी सुरू आहे.
गेल्या आठवड्यात दुसरी तक्रार दाखल : दोन विद्यार्थिनींनी तक्रारी दिल्याचं कॉलेज प्रशासनानं सांगितलं. त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दुसरी तक्रार मिळाली असून त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती बी जे मेडिकल कॉलेजचे प्राचार्य विनायक काळे यांनी दिली. या संदर्भात विविध विभागांना अहवाल पाठविण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
हे वाचलंत का :