मुंबई Police Raid On Bar In Mumbai : पुणे पोर्श कार अपघात झाल्यानंतर मुंबई पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. मुंबई पोलिसांनी शहरातील बार आणि पबची झाडाझडती घेतली. रविवारी आणि सोमवारी पोलिसांनी तब्बल 50 ठिकाणी छापेमारी केली. यावेळी पाच बारवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर : एका बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा पोर्श कार भरधाव वेगात चालवताना ती दुचाकीला धडकली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली. अपघातापूर्वी अल्पवयीन तरुणानं मद्यपान केल्याचे व्हिडिओ आणि पुरावे समोर आल्यामुळे मुंबई पोलिसांनीही ही घटना गांभीर्यानं घेतली आहे. मुंबई पोलिसांनी तब्बल 50 ठिकाणी छापेमारी केली.

बार आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना दिली जाते दारू : मुंबई पोलिसांनी शहरातील बार आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते का, याबाबतची तपासणी केली. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण आहेत, का याचा तपासही मुंबई पोलिसांनी सुरू केला. अल्पवयीन मुलांना दारू किंवा अन्य वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबई पोलिसांनी तब्बल 50 बार आणि पबवर छापेमारी केली. पवईतील एका बारच्या मॅनेजर आणि वेटरवर अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पाच बारवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलाला मद्य देणं पडलं महागात : अल्पवयीन मुलाला मद्य सर्व्ह करणं पवाईतील बार अँड रेस्टॉरंटला चांगलंच महागात पडलं. पवईतील लोटस बार अँड रेस्टॉरंटच्या मॅनेजर आणि वेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लोटस बारमध्ये अल्पवयीन मुलाला मद्य दिलं जात असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी लोटस बार अँड रेस्टॉरंटवर छापेमारी केली. या छापेमारीत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याचं स्पष्ट होताच बारवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलम 77 नुसार कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या परवाना विभागाला कारवाईचा अहवाल पोलीस पाठवणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case
- डॉ. अजय तावरे राहत असलेल्या सोसायटीतील नागरिक आक्रमक; म्हणाले, इथं राहायची लाज.... - Pune Hit And Run Case
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ॲक्शन मोडवर, ससूनमधील 'त्या' दोन्ही डॉक्टरांवर कारवाई - डॉ. विंकी रुघवानी - Pune hit and run case