पुणे Gangsters Parade In Pune : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळसोबतचा फोटो ट्विट करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आता यापुढे रोज एक फोटो ट्वीट करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं संजय राऊतच्या ट्विटनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत. पुणे पोलिसांनी आज शहरातील गुन्हेगार तसंच टोळीच्या म्होरक्यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड घेण्यात आलीय. या गुन्हेगारांमध्ये गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके अशा 10 टोळीप्रमुखांचा समावेश होता. शहरातील 200 हून अधिक गुन्हेगारांना बोलावून परेड काढण्यात आली.
गुन्हेगारांना कडक इशारा : यापुढं कोणत्याही गुन्हेगारांनी रिल्स बनवू नये, असा कडक इशारा गुन्हेगारांना देण्यात आला आहे. या गुन्हेगाराकडून कोणताही गुन्हा घडू नये यासाठी आज शहरातील 200 हून अधिक गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलण्यात आलं होतं, असं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं. यापुढं गुन्हा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही गुन्हेगारांना दिला आहे. ही आमची नियमित परेड असल्याचं देखील झेंडेंनी म्हटलंय. पुणे पोलिसांनी आज परेडसाठी बोलावलेल्या गुन्हेगारांमध्ये नीलेश घायवळ, गजानन मारणे, बाबा बोडके, सचिन पोटे, मतीन शेख, बंडू आंदेकर टोळी, उमेश चव्हाण, बापू नायर, खडा वसीम यांचा समावेश होता.
खासदार राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका : दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले होतं. त्याचवेळी विजय वडेट्टीवार, संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली होती. तसंच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ट्वीट करून त्यांच्यावर निशाणा साधला होता.
हे वाचलंत का :