पुणे Pune Ganesh Visarjan : शहरात उद्या सकाळी 10 वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल. मिरवणूक रस्त्यावर विविध विषयांवर रांगोळीच्या पायघड्याही मिरवणूक मार्गांवर घालण्यात येतील. गणरायाला निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून, विसर्जन मिरवणुकीची तयारी मंडळाकडून पूर्ण झाली आहे.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघणार आहे. मिरवणुकीमध्ये गायकवाड बंधूचे सनई वादन आणि देवलकर बंधूंचे चौघडावादन, नगारखाना, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचे पथक असेल. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि परशुराम ढोल-ताशा पथके असणार आहेत. मिरवणूक मार्गांवरील चौका चौकात भाविकांसाठी श्रींची पालखी उभी राहील.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघेल. पारंपरिक पोशाखात त्यामध्ये कार्यकर्ते सहभागी होतील. सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, समर्थ प्रतिष्ठान, ताल, शिवमुद्रा ढोल-ताशा पथके असतील. विष्णूनादचे कार्यकर्ते पालखीपुढे शंख नाद करतील. यंदा शिवराज्याभिषेक रथ असेल.
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम मंडळात स्वप्निल व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांच्या सूर्यरथात रथात श्रींची मूर्ती विराजमान होईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँन्ड असेल. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगांव) प्रात्यक्षिके सादर करतील. नादब्रह्म, नादब्रह्म ट्रस्ट, गर्जना ढोलताशा पथके असतील. यंदा विशेष बाब म्हणजे राज्यात प्रथमच सुरू झालेलं तृतीय पंथीयांचं शिखंडी पथक आपलं वादन करणार आहे.
मानाचा चौथा - तुळशीबाग गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक जगन्नाथ पूरी रथातून निघणार आहे. मिरवणुकीत लोणकर बंधूंचा नगारा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी ही ढोलताशा पथक सहभागी होणार आहेत. स्वरूपवर्धिनीचे विद्यार्थी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर करतील. श्रींचा रथ कार्यकर्ते स्वतः ओढणार आहेत.
मानाचा पाचवा - केसरीवाड्याचा गणपती मंडळाची लाकडी पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाल्यावर रथातून मिरवणूक निघेल. बिडवे बंधूंचा नगारा, शिवमुद्रा, श्रीराम आणि आवर्तन ढोल-ताशा पथके असतील. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणुकीचे आकर्षण असेल. यंदा विशेष बाब म्हणजे इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेत असतील.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. त्यामुळे मागील वर्षी दुपारी ४ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा सहभागी झाले होते. यंदा देखील भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.
हेही वाचा..
- अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर करा गणेश विसर्जन; अन... भगवान विष्णूच्या अनंत रुपाची करा पूजा - Anant Chaturdashi 2024
- श्री उमांगमलज रथातून निघणार 'दगडूशेठ' गणपतीची मिरवणूक..., पाहा व्हिडिओ - Anant Chaturdashi 2024
- लालबागमधून विसर्जनासाठी सर्वप्रथम निघणार मुंबईचा राजा, त्यानंतर 'अशी' निघणार बाप्पांची मिरवणूक - Anant chaturdashi 2024