पुणे Pune Drugs Party Case : पुण्यात गेल्या शनिवारी फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या लिक्विड लिझर लाउंज (L3) बार हॉटेलमध्ये पार्टी रंगली होती. या पार्टीत ड्रग्ज घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील 6 जणांना अटक केलीय. पार्टीमध्ये अमली पदार्थाचं सेवन करणार्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.
तीन लाखांचा मद्यसाठा जप्त : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथील लिक्विड लिझर लाउंज (L3) या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसंच हॉटेल रेनबोचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं लिक्विड लिझर लाउंज (L3) या हॉटेलची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा आढळून आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करून एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये एकूण 241 लिटर विदेशी मद्य आणि इतर साहित्य असा एकूण 3 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तपास सुरू : या प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील या पबमधील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष विकूल कामठे यांच्या नावे असलेलं हॉटेल रेनबो एफएल-3 येथे मद्यविक्री परवानाकक्ष मंजूर असून या परवानाकक्षात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशामध्ये बदल केल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळं जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा पब सील करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन : उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनाही हे प्रकरण भोवलं असून कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत या विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 1 निरीक्षक तसंच 1 दुय्यम निरीक्षक यांना निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचा