Murlidhar Mohol Pune : "पुरंदर विमानतळावरील धावपट्टीच्या विस्तारासाठी ३५ एकर जागा संपादित करण्यात आली आहे. लवकरच भूसंपादन प्रक्रिया करण्यात येईल. त्यासाठी सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत," अशी ग्वाही, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दिली. कार्यभार स्वीकारल्यानतंर त्यांनी रविवारी विमानतळासंदर्भात विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुरंदर विमानतळाचा विषय आपल्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर घेतला आहे. "पुरंदर विमानतळाचं काम लवकरच होण्याची शक्यता आहे. मूळ जागीच विमानतळ तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं मंजुरी दिली आहे. महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची लवकरच बैठक होईल. यांनतर भूसंपादन करण्यात येईल," अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
धावपट्टीकरिता ३५ एकर जागा: "पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या विस्तारासाठी ३५ एकर जागा संपादित करण्यात आली आहे. लवकरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यासाठी सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ६० टक्के सरकार मोबदला देणार आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशीदेखील याबाबत बोलणार आहे," असं त्यांनी सांगितलं. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचीदेखील त्यांनी यावेळी पाहणी केली. संरक्षण विभागाच्या जागेत हे विमान शिफ्ट करावं, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाला एक पत्र दिलं असल्याचं मंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
नवीन टर्मिनल लवकरच सुरू: नवीन विमानतळासंदर्भात लवकरात लवकर मनुष्यबळ देऊ असा शब्द गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. पुरंदर विमानतळाबाबत १ ए लोकेशनला मान्यता दिली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं (डीजीसीए) सुद्धा मान्यता दिली आहे. यात तांत्रिक अडचणी फारशा येणार नाहीत. तसेच नवी मुंबई विमानतळाचं ७० टक्के काम पूर्ण झालं. ३० टक्के काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा