कोल्हापूर PSI Story : चार अपत्यांपैकी एक तरी शासकीय सेवेत असावा अशी दिवंगत वडिलांची इच्छा, आईलाही लाडक्या लेकीला खाकीत बघायचं होतं. आई-वडिलांचं स्वप्न उराशी बाळगून कोणताही खासगी क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मागासवर्गीय प्रवर्गातून मुलींमधून पहिली येण्याचा बहुमान पटकावलेल्या कोल्हापुरातील नेर्ली गावच्या राखी कांबळे या तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी. वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालून हे लख्ख यश मिळवलं असल्याचं राखी कांबळेनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
12 तास केला अभ्यास : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील निवृत्त शिपाई रमेश कांबळे यांनी आपल्या चारही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. कांबळे यांची मोठी मुलगी रेमा ह्या राजाराम महाविद्यालय या ठिकाणी अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत तर रीना पुण्यात आयटी कंपनीत सर्विसला आहेत, तृतीय कन्या राखीनं शिवाजी विद्यापीठातून आपलं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण करुन 2020 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. कोणताही खासगी क्लास न लावता दररोजचा 12 तास अभ्यास करुन राखी कांबळेनं पहिल्याच प्रयत्नात मागासवर्गीय महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय. गुरुवारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कांबळे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. डोंगराएवढं कष्ट करुन मिळवलेल्या यशात वडील सोबत नसल्याची खंत मात्र राखी कांबळेंन व्यक्त केली, पोलीस प्रशासनात चांगली सेवा करण्याचा निर्धार तिनं व्यक्त केलाय.
आईच्या आनंदाला गगन ठेंगणं : पाठोपाठ तीन मुली नंतर मुलगा जन्माला आला मात्र मुलींवर होणारा शिक्षणाचा खर्च एकट्या नवऱ्याच्या पगारावर पूर्ण होत नव्हता, शेजारी, नातेवाईक मुलींना इतकं का शिकवता असा प्रश्न विचारायचे मात्र दिवंगत रमेश कांबळे आणि त्यांच्या पत्नी सविता यांनी ही आमची भविष्यातील गुंतवणूक आहे, त्यामुळे मुलींना शिकवणार असा निर्धारच केला होता, तिन्ही मुली आणि मुलग्याला चांगलं शिक्षण दिल्यामुळेच आज यशाचा दिवस उगवल्याचं सांगताना सविता कांबळे यांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा :