मुंबई Narendra Modi road show in Mumbai : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार असून यामध्ये मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी मुंबईमध्ये प्रचारासाठी कंबर कसली आहे. कारण निवडणूक प्रचारासाठी जेमतेम चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. म्हणूनच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपर येथे मुंबई उत्तर पूर्व मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या प्रचारासाठी रोड शो करत आहेत. या रोड शो बाबत अधिकृत माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
मुंबईत सहा पैकी सहा जागा जिंकण्याचा निर्धार : मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी सहा जागा जिंकण्याचा निर्धार मुंबई भाजपांनं केला आहे. मुंबईतील सध्याचं राजकीय वातावरण पाहता मुंबईतील एकूण सहा जागांपैकी ३ मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये लढत होत आहे. इतर तीन मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर एका ठिकाणी भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळं ही निवडणूक महायुतीसाठी तसंच महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
उत्तर पूर्व मुंबई मतदार संघात गुजराती मतदार : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवार मिहीर कोटेच्या विरोधात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघामध्ये मराठी तसंच गुजराती मतदारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मराठी विरुद्ध गुजराती असा वाद मध्यंतरी या मतदारसंघांमध्ये दिसून आला होता. भाजपानं यंदा विद्यमान आमदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करून मिहीर कोटेच्या यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सायंकाळी साडेचार वाजता घाटकोपर, पश्चिम, एलबीएस रोड, अशोक सिल्क मिल येथून रोड शो सुरु होणार आहे. हा रोड शो पार्श्वनाथ जैन मंदिर, घाटकोपर पूर्व येथे संपणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. यासाठी तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं हजर रहा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे, असं आशिष शेलार यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय.
पोलिसांकडून सुरक्षेची खबरदारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या घाटकोपर, मुंबईत मोठा रोड शो होणार आहे. त्यांच्या रोड शोची प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मोदींच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू झालं आहे. मुंबई पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग सुरू केलं आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. मोदींच्या रोड शोमुळं मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीत मुंबई पोलिसांकडून आतापासून सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे. जिथं उंच इमारती आहेत तिथंही पोलीस बंदोबस्त असेल. रस्त्याच्या दुतर्फा अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या मुंबई महापालिकेच्या वतीनं छाटण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबांवर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सध्या सुरू आहे.
भाजपा जोरदार शक्ती प्रदर्शन : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी साडेचार वाजता मुंबईत रोड शो करणार आहेत. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिजपर्यंत मोदींचा रोड शो होणार आहे. घाटकोपरमध्ये मोदींचा सुमारे अडीच किमीचा रोड-शो होणार आहे. मुंबईत वातावरण निर्मितीसाठी भाजपाकडून मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. अशोक सिल्क मिल ते सर्वोदय सिग्नल, संघवी स्क्वेअर, पार्श्वनाथ चौक, श्रेयस टॉकीज, सीआयडी ऑफिस, हवेली ब्रिजपर्यंत मोदींचा रोड शो होणार आहे. भाजपाच्या मुंबईतील उमेदवारांसाठी हा रोड शो असेल. या रोड शोच्या माध्यमातून भाजपा जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे.
'हे' मार्ग राहणार बंद : एलबीएस मार्गावरील रोड शोसाठी वाहतूक पोलिसांनी निर्बंध जारी केले आहेत. LBS-गांधीनगर जंक्शन-नौपाडा जंक्शन-माहुल घाटकोपर मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहील.
- मेघराज जंक्शन-आरबी कदम जंक्शनपर्यंतची वाहतूकही बंद राहणार आहे.
- अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन बंद राहण्याची शक्यता आहे.
- हिरानंदानी कॉम्प्लेक्स ते गुलाटी पेट्रोल पंपापर्यंत वाहतूक ठप्प होऊ शकते.
- गोळीबार मैदान, घाटकोपर मेट्रो स्टेशन पश्चिमेकडे ते सर्वोदय जंक्शन वाहतुकीसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
'हे' आहेत पर्यायी मार्ग :
- पूर्व द्रुतगती महामार्ग
- पश्चिम द्रुतगती महामार्ग
- अंधेरी-कुर्ला मार्ग
- साकी विहार मार्ग
- एमआयडीसी सेंट्रल रोड
- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)
- सायन-वांद्रे लिंक रोड
- जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR)
हे वाचलंत का :
- घाटकोपर दुर्घटना : 'त्या' 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - Hoarding collapsed in Ghatkopar
- अदानीचा पीएम सोबत फोटो म्हणजे त्यांची पार्टनरशिप का? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Wadettiwar On Ghatkopar Accident
- राज्यात निवडणूक प्रचारात जुमलेबाजीची 'दीवार' - Lok Sabha Election 2024